मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतल्या सर्वात यशस्वी संघापैकी एक संघ. मुंबई इंडियन्सने पाचवेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सचा प्रचंड असा चाहता वर्गही आहे. आयपीएल सुरू झालं तेव्हापासून एक ब्रँड म्हणून मुंबई इंडियन्सने चाहत्यांच्या मनात आणि बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईने आपला करिष्मा वाढवताना दुबईत सुरू झालेल्या IL20 आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेल्या SA20 स्पर्धेत संघ खरेदी केला आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारे बरेच खेळाडू या नव्या संघांकडून खेळताना दिसतात. सध्याच्या घडीला दुबई आणि दक्षिण आफ्रिकेत लीग सुरू आहेत. या लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे संघ खेळत आहेत. पण या सामन्यांमध्ये मुंबईकडून झालेल्या चुका सच्च्या चाहत्यांना पटणार नाहीत. काय झालं नेमकं ते वाचाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठिकाण-दुबई. लीगचं नाव- IL20. संघ- मुंबई इंडियन्स एमिरेट्स आणि डेझर्ट व्हायपर्स. मुंबई इंडियन्स एमिरेट्स संघाची प्रथम फलंदाजी सुरू होती. १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंबाती रायुडू बाद झाला. वानिंदू हासारंगाने त्याला बाद केलं. रायुडूने २३ धावांची खेळी केली.

रायुडू तंबूत परतत असताना पुढचा फलंदाज ओडियन स्मिथ मैदानात अवतरला. त्याचं आणि टीम डेव्हिडचं बोलणं झालं. प्रतिस्पर्धी संघाने क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात केली. तितक्यात चौथे पंच अलीम दार मैदानातल्या पंचांना काहीतरी खुणावून सांगत असल्याचं दिसलं. मैदानातील पंच रुचिरा पल्लियागुरुगे आणि अकबर अली यांनी चौथे पंच अलीम दार यांच्याशी चर्चा केली. तोपर्यंत अलीम दार आणि मुंबई इंडियन्स एमिरेट्सचे फलंदाजी प्रशिक्षक अजय जडेजा तसंच कर्णधार निकोलस पूरन यांच्यात चर्चा झाली. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेतही सुपरसब नियमाची तरतूद आहे. संघाला आवश्यकता वाटेल त्यावेळी अंतिम अकरातून एका खेळाडूला बाजूला करुन नव्या खेळाडूला पाचारण करता येतं. एकदा बदली खेळाडूला घेतलं की मूळ खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करू शकत नाही. मुंबई इंडियन्सच्या अंतिम अकरात ओडियन स्मिथचं नाव नव्हतं.

नाणेफेकेवेळी सुपरसब्स खेळाडूंची यादी प्रतिस्पर्धी संघाला देणं अपेक्षित असतं. मुंबई इंडियन्स एमिरेट्सने नाणेफेकेवेळी दिलेल्या सुपरसब्सच्या यादीत ओडियन स्मिथचं नाव नव्हतं. संघव्यवस्थापनाच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. त्यांनी स्मिथला मनमुराद फटकेबाजीच्या उद्देशाने पाठवलं. पण चौथ्या पंचांच्या ही गडबड लक्षात आली आणि त्यांनी मैदानावरील पंचांना ही गोष्ट लक्षात आणून दिलं. त्यांनी स्मिथला खेळण्यापासून रोखलं. पंचांनी परवानगी नाकारल्याने ओडियन स्मिथ माघारी परतला.

स्मिथला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच ड्वेन ब्राव्हो फलंदाजीला उतरला. ब्राव्होने १० चेंडूत १० धावा केल्या. ब्राव्हो आणि डेव्हिड जोडीने सातव्या विकेटसाठी २१ चेंडूत ३७ धावांची खेळी केली.

……………………………..

ठिकाण- केपटाऊन. लीग SA20. संघ- मुंबई इंडियन्स केपटाऊन वि जोहान्सबर्ग सुपर किंग्स. केपटाऊन संघाची मालकी मुंबई इंडियन्सकडे तर जोहान्सबर्गची चेन्नई सुपर किंग्सकडे.

पावसामुळे हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना ८० धावांची मजल मारली. कर्णधार कायरेन पोलार्डने १० चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ३३ धावांची खेळी केली. रायन रिकेलटनने २३ तर रासी व्हॅन डर डुसेने १६ धावा केल्या. जोहान्सबर्ग संघाकडून इम्रान ताहीरने २ विकेट्स पटकावल्या.

जोहान्सबर्ग संघाला ८ षटकात ९८ धावांचे लक्ष्य मिळाले. चेन्नईचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लीसूस डू प्लॉय अतिशय आक्रमक पद्धतीने खेळत होते. हे दोघे चेन्नईला जिंकून देणार हे लक्षात आल्यानंतर मुंबईचा कर्णधार कायरेन पोलार्डने वेगळेच डावपेच आखले. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूआधी पोलार्डने कागिसो रबाडाकडे चेंडू सोपवला. पण अगदी आयत्या वेळेस रबाडाला रोखलं. पोलार्डचा कावा फाफ डू प्लेसिसच्या लक्षात आला. त्याने मुंबई संघव्यवस्थापन आणि पंचांच्या हे लक्षात आणून दिलं. रबाडाला गोलंदीजापासून रोखण्यामागे वेळकाढूपणा करणे हे पोलार्डचं उद्दिष्ट होतं. चेन्नईच्या ४ षटकात ५७ धावा झाल्या होत्या. पावसाचे ढग दाटले होते. जोहान्सबर्ग संघाने ५ षटकं फलंदाजी केली नाही तर सामन्याचा निकाल रद्द असा लागेल हे पोलार्डला पक्कं ठाऊक होतं. जोहान्सबर्गला जिंकू न देण्यासाठी पोलार्डने खिलाडूवृत्तीला न साजेसं वर्तन केलं.

या घटनेनंतरही डू प्लेसिस-डू प्लॉय जोडीची एकाग्रता भंगली नाही. पोलार्डने रबाडालाच गोलंदाजी दिली. या जोडीने या षटकात ३ चौकार आणि एका षटकारासह २० धावा चोपून काढल्या. चौकार-षटकारांची लयलूट कायम राखत जोहान्सबर्ग संघाने ३४ चेंडूतच ९८ धावांचं लक्ष्य गाठलं. फाफने २० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावांची वेगवान खेळी केली. डू प्लॉयने १४ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली.