Mumbai Indians announces Hardik Pandya as captain for IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबईने काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सशी हार्दिक पंड्याचा ट्रेडऑफ केला होता. याआधी रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. रोहित दीर्घकाळ संघाचा कर्णधार राहिला. त्यांच्या उपस्थितीत मुंबईने पाचवेळा विजेतेपद पटकावले. मात्र आता रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. पंड्याने गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले आहे.
मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून पंड्याला कर्णधार नियुक्त केल्याची माहिती दिली आहे. मुंबईने निवेदनात लिहिले की, ‘मुंबई इंडियन्स आज कर्णधार बदलाची घोषणा करत आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या पुढच्या सत्रात कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत यश मिळवले आहे.’ संघाने लिहिले की, आमची टीम रोहित शर्माची आभारी आहे. २०१३ पासून आतापर्यंतचा त्याचा कार्यकाळ उत्कृष्ट राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.
हार्दिक पंड्याची आयपीएलमधील कामगिरी –
हार्दिक पंड्या याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपदही पटकावले आहे. त्याचबरोबर संघाने गेल्या मोसमात अंतिम फेरीही गाठली. हार्दिकची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली, तर ती उत्कृष्ट राहिली आहे. पंड्याने आतापर्यंत १२३ आयपीएल सामने खेळले आहेत. या कालावधीत २३०९ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ५३ विकेट्सही घेतल्या आहेत. १७ धावांत ३ विकेट्स ही हार्दिकची आयपीएल सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत त्याने १० अर्धशतकेही झळकावली आहेत.
हेही वाचा – हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडे?
रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरी –
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा चॅम्पियन ठरला आहे. मुंबईने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि ४२ अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल २००८ मध्ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्याने डेक्कन चार्जेसकडून खेळताना पदार्पण केले होते.