*   चेन्नईवर ६० धावांनी दणदणीत विजय
*   मुंबईने ७९ धावांत गुंडाळले
*   चेन्नईचा हंगामातील नीचांक
*   मिचेल जॉन्सन ठरला सामनावीर
‘तुम्ही भले आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असाल, पण आमच्याशी पंगा घ्याल तर पराभव सोडून पदरी काहीही पडणार नाही,’ हे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर साखळीतील दोन्ही सामन्यांमध्ये मर्दुमकी गाजवत दाखवून दिले. १४० धावांचे आव्हान सहजसाध्य होणारे असले तरी मुंबईने भेदक आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईवर तब्बल ६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. गुणतालिकेत अव्वल असलेल्या चेन्नईला मात्र या सामन्यात हंगामातील धावसंख्येचा निचांक गाठण्याची नामुष्की ओढवली. शनिवारच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव ८० धावांवर आटोपला होता. मुंबईने चेन्नईचा ७९ धावांत खुर्दा उडवत त्यावर कडी केली आणि मुंबईकरांचा रविवार विजयाच्या भेटीने सत्कारणी लावला. चेन्नईला पहिले तीन धक्के देत त्यांचे कंबरडे मोडून मुंबईचा विजयाध्याय लिहिणाऱ्या वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
चेन्नईच्या डावाची नाटय़पूर्ण सुरुवात झाली. मिचेल जॉन्सनच्या पहिल्याच षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर माइक हसीचे सलग तीन झेल किरॉन पोलार्डने ‘पॉइंट’वर सोडले. पण हार मानेल तो जॉन्सन कसला. त्यानंतरच्याच षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर जॉन्सनने तीन बळी मिळवत चेन्नईच्या डावाला सुरुंग लावला. या धक्क्यातून चेन्नईचा संघ अखेपर्यंत सावरू शकला नाही आणि या हंगामातील नामुष्कीचा पराभव त्यांनी पत्करला. तीन जीवदान मिळणाऱ्या हसीला फक्त २२ धावा करता आल्या, तर चेन्नईच्या आठ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही करता आली नाही. जॉन्सन आणि डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून ठणठणीत वानखेडेच्या खेळपट्टीवर फलंदाजीचा योग्य निर्णय घेतला असला तरी सचिन तेंडुलकर (१५) आणि ड्वेन स्मिथ (२२) या सलामीवीरांना संघाला साजेशी सुरुवात करून देता आली नाही. हाणामारीच्या पहिल्या सहा षटकांमध्ये ३२ धावा मुंबईला जमवता आल्या. सातव्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर सचिन फसला आणि पायचीत होत तंबूत परतला. रुसलेली धावगती फुगवण्याच्या नादात मुंबईने लागोपाठ फलंदाज गमावले. जडेजाने सचिननंतर किरॉन पोलार्ड (१) आणि दिशेन कार्तिक (२३) यांना बाद करत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातली. १६ षटकांत मुंबईची ५ बाद ८२ अशी अवस्था झाली असताना हरभजन सिंग फलंदाजीला आला आणि त्याला साथीला घेत कर्णधार रोहित शर्माने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रोहित आणि हरभजन यांनी सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला १३९ धावांचा पल्ला गाठून दिला. रोहितने दडपणाखाली अप्रतिम फलंदाजी करत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३९ धावांची खेळी साकारली, तर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या हरभजनने अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत ११ चेंडूंत २ षटकार आणि २ चौकारांच्या जोरावर नाबाद २५ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १३९ (रोहित शर्मा नाबाद ३९, हरभजन सिंग नाबाद २५; रवींद्र जडेजा ३/२९) विजयी वि. चेन्नई सुपर किंग्ज : १५.२ षटकांत सर्व बाद ७९ (माइक हसी २२; प्रग्यान ओझा ३/११, मिचेल जॉन्सन ३/२७).
सामनावीर : मिचेल जॉन्सन.

डेल स्टेन, सनरायजर्स हैदराबाद
क्रिकेटच्या मैदानावरची ही सर्वात अतक्र्य गोष्ट आहे. सलग चार चेंडूंवर एकाच खेळाडूने मारलेला फटका एकाच क्षेत्ररक्षकाकडे! माझ्या कारकीर्दीत तरी अशी घटना मी बघितलेली नाही!!

वानखेडेवरून निळा जनसागर
रविवारी सुट्टीच्या दिवशी वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही तगडय़ा संघांचा सामना पाहण्यासाठी मुंबईकरांनी चांगलीच गर्दी केली होती. मुंबईला पाठिंबा देण्यासाठी निळे टी-शर्ट आणि मुंबई इंडियन्सचे निळे झेंडे स्टेडियममध्ये सर्वत्र दिसत होते, त्यामुळे वानखेडे निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.

दी ब्राव्हो शो!
‘पर्पल कॅप’ पटकावणारा ड्वेन ब्राव्हो हा त्याच्या नाचासाठी प्रसिद्ध आहे. स्वत:च्या गोलंदाजीवर ब्राव्होने वेस्ट इंडिजच्याच ड्वेन स्मिथचा झेल घेतल्यावर ब्राव्होने दिलखेचक नृत्य सादर केले. त्यानंतर ‘मिड ऑफ’ला क्षेत्ररक्षणसाठी उभा असताना त्याला प्रेक्षकांनी नाचण्याची विनंती केली आणि प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत त्याने काही अदा करून दाखवल्या.

संथ सुरुवातीने केला घात
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी पाटा असल्याने चेंडू बॅटवर सहज येत होता. पण सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांनी संथ सुरुवात केली आणि तीच संघाला भोवली. संथ सुरुवात करून हे दोघेही बाद झाले आणि त्यामुळे पन्नास धावा करण्यासाठी मुंबईला तब्बल ६४ चेंडू मोजावे लागले.

पॉन्टिंगचा रोहितला सल्ला
१६व्या षटकात ५ बाद ८२ अशी अवस्था असताना ‘टाइम आऊट’ झाला आणि मैदानात आला तो चक्क रिकी पॉन्टिंग. मैदानात असलेल्या रोहितकडे जाऊन पॉन्टिंगने त्याला सल्ला दिला. रोहितनेही शांतपणे त्याचा सल्ला ऐकला आणि त्यानंतर दणकेबाज फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
– प्रसाद मुंबईकर

Story img Loader