मुंबई : एका स्थानासाठी दोन किंवा अधिक खेळाडूंमध्ये स्पर्धा असणे कधीही चांगले. प्रत्येक संघाला हेच हवे असते. या मैत्रीपूर्ण स्पर्धेमुळेच खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते आणि याचा संघाला फायदा होतो, असे मत महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामीने व्यक्त केले.
‘डब्ल्यूपीएल’च्या तिसऱ्या हंगामाला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून मुंबई संघाकडून बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात झुलनसह मुंबई संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, मुख्य प्रशिक्षक शार्लट एडवर्ड्स आणि अष्टपैलू सजना सजीवन उपस्थित होत्या. त्यानंतर ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम महिला खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या झुलनने ‘डब्ल्यूपीएल’ आणि महिला क्रिकेटशी निगडित विविध विषयांवर आपले मत मांडले.
‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या हंगामात जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई संघाला दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीने अवघ्या पाच धावांनी हुलकावणी दिली होती. आगामी हंगामासाठी मुंबईने काही प्रतिभावान युवा खेळाडूंना संघात समाविष्ट केले असून विशेषत: १६ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज जी. कमलिनीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाकडून खेळताना कमलिनीने चमक दाखवली. त्यामुळे ‘डब्ल्यूपीएल’च्या आगामी हंगामात तिला पहिल्या सामन्यापासून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यास्तिका भाटियानेही गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी केल्याने मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर पहिल्या पसंतीची यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून कोणाची निवड करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘‘आम्हाला ही डोकेदुखी हवीहवीशी आहे. खेळाडूंमध्ये स्पर्धा असायलाच हवी. त्यामुळेच संघ मजबूत होतो. कमलिनीने युवा गटात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे तिला संधी देण्याबाबत आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. मात्र, १९ वर्षांखालील क्रिकेट आणि वरिष्ठ गटाचे क्रिकेट यात खूप फरक आहे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. कमलिनीला अजून शिकण्यासारखे खूप आहे. आमच्या दृष्टीने संघ सर्वांत महत्त्वाचा आहे. जी खेळाडू संघाच्या यशात अधिक योगदान देऊ शकते असे आम्हाला वाटेल, तिलाच संधी दिली जाईल,’’ असे झुलन म्हणाली.
तसेच अलीकडच्या काळात आक्रमकतेला अधिक महत्त्व दिले जात आहे. मात्र, एकाच शैलीत खेळून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्याकडे दोन-तीन योजना असायला हव्यात. परिस्थितीशी जुळवून घेणे सर्वांत आवश्यक असते, असा सल्ला झुलनने युवा खेळाडूंना दिला.
युवा संघाचे यश प्रेरणादायी हरमनप्रीत
भारताच्या युवा महिला संघाने सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत असल्याचे मुंबई इंडियन्स आणि भारताच्या वरिष्ठ महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. ‘‘युवा संघाने सलग दोन वेळा विश्वचषक जिंकून स्वत:साठी एक स्तर निश्चित केला आहे. हे फारच कौतुकास्पद आहे. आम्हाला त्यांच्या कामगिरीचा खूप अभिमान आहे,’’ असेही हरमनप्रीत म्हणाली.