जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी सलामीच्या सामन्यातच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. १५८ या मुंबई इंडियन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना लायन्सची सातव्या षटकांत २ बाद ३७ अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर नील मॅकेन्झी आणि क्विंटन डि कॉक यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १२१ धावांची भागीदारी करत लायन्सला शानदार विजय मिळवून दिला.
मॅकेन्झीने ४१ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद ६८ धावांची तुफानी खेळी केली. डि कॉकने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा फटकावल्या. या दोघांच्या बेधडक फटकेबाजीमुळे लायन्सने ७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे गुलाम बोदी आणि अलविरो पीटरसन यांनी संथ खेळ केला. यामुळे मॅकेन्झी आणि डि कॉकवर वाढत्या धावगतीचे दडपण होते. मात्र या दोघांनी सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला आणि शेवटच्या टप्प्यात चौकार-षटकारांची बरसात केली. धवल कुलकर्णीने टाकलेल्या १६व्या षटकात १७ धावा वसूल झाल्या तर हरभजनने टाकलेल्या १७व्या षटकात १६ धावा फटकावण्यात आल्या. धवलने ३ षटकांत ३७ धावा दिल्या तर हरभजनच्या ४ षटकांत ३७ धावांची खैरात झाली.
तत्पूर्वी फलंदाजांच्या छोटय़ा पण उपयुक्त खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दीडशेचा टप्पा ओलांडला. सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांनी मुंबई इंडियन्सला ४५ धावांची चांगली सलामी दिली. स्मिथला मॉरिसने बाद करत ही जोडी फोडली. युवा आरोन फॅनगिसोने तेंडुलकरला बाद केले. तेंडुलकरने १६ धावा केल्या.
रोहित शर्माने २७ चेंडूत २७ धावा केल्या. मोठय़ा खेळीच्या दिशेने तो वाटचाल करणार असे वाटत असतानाच डर्क नॅन्सने त्याला बाद केले. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या मिचेल जॉन्सनने २९ चेंडूंत ३० धावा केल्या. तडाखेबंद फलंदाज कीरेने पोलार्डला सोहेल तन्वीरने त्रिफळाचीत केले. दिनेश कार्तिकने ९ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा फटकावल्या आणि मुंबईने २० षटकांत १५७ धावांची मजल मारली.
६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या मॅकेन्झीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का
जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी सलामीच्या सामन्यातच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
First published on: 16-10-2012 at 09:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians defeat