घरच्या मैदानावरचा अभेद्य राहण्याचा मुंबई इंडियन्सचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जने मोडून काढला होता. मात्र या पराभवाने खचून न जाता मुंबई इंडियन्सने तुल्यबळ सनरायजर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानात ७ विकेट्सने चीतपट केले. विजयासाठी मिळालेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना लेंडल सिमन्स आणि अंबाती रायुडू या जोडीने केलेल्या भागीदारीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हैदराबादने दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मुरलीधरन गौतम एक धाव करून तंबूत परतला. मात्र यानंतर लेंडल सिमन्स आणि अंबाती रायुडू जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची मॅरेथॉन भागीदारी रचत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांबरोबर चौकार-षटकारांची बरसात केली. सिमन्सने ५० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. रायुडूने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनी कोणतीही पडझड होऊ न देता मुंबईला सहज विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शिखर धवन ११ तर लोकेश राहुल १० धावांवर बाद झाले. मात्र यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या ऑस्ट्रेलियन जोडगोळीने तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत डाव सावरला.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ३ बाद १५७ (आरोन फिंच ६८, डेव्हिड वॉर्नर ५५, लसिथ मलिंगा २/३५) पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स : १८.४ षटकांत ३ बाद १६० (लेंडल सिमन्स ६८, अंबाती रायुडू ६८, भुवनेश्वर कुमार २/२१)
सामनावीर : अंबाती रायुडू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा