‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने काळवंडलेल्या पाश्र्वभूमीवर राजस्थान रॉयल्सला चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता आली नाही. ड्वेन स्मिथ आणि आदित्य तरेची तुफान फटकेबाजी आणि अखेरच्या षटकांत अंबाती रायुडूने केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा चार विकेट्सनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्सला रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी झुंज द्यावी लागेल.
राजस्थानचे १६६ धावांचे आव्हान पेलताना आदित्य तरे आणि ड्वेन स्मिथ यांनी मुंबईला सुरेख सुरुवात करून दिली. तरेने तीन चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी करताना ३५ धावांचे योगदान दिले. त्याने स्मिथसह ७० धावांची सलामी देत मुंबईच्या विजयाची पायाभरणी केली. तरे बाद झाल्यावर सुरुवातीला सावध खेळणारा स्मिथ नंतर आक्रमक झाला. त्याने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. स्मिथने ४४ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ६२ धावांचे योगदान दिले. मात्र दिनेश कार्तिक (२२), कर्णधार रोहित शर्मा (२) आणि स्मिथ तसेच किरॉन पोलार्ड (११) एकापाठोपाठ बाद झाल्याने मुंबईसाठी सहज वाटणारा विजय खडतर झाला. १० चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना अंबाती रायुडूने केव्हॉन कूपरच्या षटकांत एक चौकार आणि एक षटकारासह १५ धावा वसूल केल्या. अखेर मुंबईने एक चेंडू राखून विजयासह अंतिम फेरी गाठली.
कर्णधार राहुल द्रविड आणि दिशांत याग्निक यांनी केलेल्या दणकेबाज फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या क्लालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर १६६ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला द्रविड आणि अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी सुरेख सुरुवात करून दिली. द्रविडने फ्लिक आणि कव्हर-ड्राईव्हचे सुरेख फटके लगावत चौकार वसूल केले. या दोघांनी सलामीसाठी ४४ धावांची भर घातली. ऑफस्पिनर हरभजन सिंगने रहाणेचा (२१) त्रिफळा उडवला. त्यानंतर शेन वॉटसन (६), संजू सॅमसन (०) आणि द्रविड माघारी परतल्यामुळे राजस्थानची ४ बाद ८७ अशी स्थिती झाली. द्रविडने ३७ चेंडूंत सात चौकारांसह ४३ धावांची खेळी
साकारली.
मुंबईचे गोलंदाज सामन्यावर पकड मिळवणार, असे वाटत असतानाच स्टुअर्ट बिन्नी, ब्रॅड हॉज आणि याग्निक यांनी आक्रमक फटकेबाजी करत राजस्थानला सन्मानजनक धावसंख्येवर आणून ठेवले. बिन्नीने १७ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह २७ धावा फटकावल्या. याग्निकने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना १७ चेंडूत पाच चौकारांनिशी नाबाद ३१ धावा फटकावत राजस्थानला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. मुंबईकडून हरभजनने तीन तर किरॉन पोलार्डने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १६५ (राहुल द्रविड ४३, दिशांत याग्निक नाबाद ३१, स्टुअर्ट बिन्नी २७; हरभजन सिंग ३/२३, किरॉन पोलार्ड २/६) पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स : १९.५ षटकांत ६ बाद १६९ (ड्वेन स्मिथ ६२, आदित्य तरे ३५; केव्हॉन कूपर २/३३).
मुंबई अंतिम फेरीत
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने काळवंडलेल्या पाश्र्वभूमीवर राजस्थान रॉयल्सला चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता आली नाही. ड्वेन स्मिथ आणि आदित्य तरेची तुफान फटकेबाजी आणि अखेरच्या षटकांत अंबाती रायुडूने केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा चार विकेट्सनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
First published on: 25-05-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians enter ipl 2013 final with 4 wicket win over rajasthan royals