आयपीएलचे सहावे पर्व मुंबई इंडियन्ससाठी खास ठरले आहे. वानखेडे स्टेडियमवरील आतापर्यंतचे सहापैकी सहा सामने मुंबईने जिंकून घरच्या मैदानावरील आपली ‘दादागिरी’ सिद्ध केली आहे. त्यामुळे सोमवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धची लढत जिंकून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याचे मनसुबे मुंबई संघाने आखले आहेत. पण या हंगामात नव्याने आलेल्या सनरायजर्स हैदराबादलासुद्धा कमी लेखून चालणार नाही. ‘डार्क हॉर्स’ सनरायजर्सचे तीन सामने बाकी असल्याने त्यांनाही बाद फेरीचे स्वप्न साकारता येऊ शकते.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. १३ सामन्यांपैकी नऊ जिंकणाऱ्या मुंबईच्या खात्यावर १८ गुण जमा आहेत, तर हैदराबादने १३ पैकी ८ सामने जिंकत १६ गुण जमा केले आहेत. रविवारी मुंबई इंडियन्सने गहुंजे येथे पुणे वॉरियर्सचा पाच विकेट राखून आरामात पराभव करीत ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने आपले पाऊल मजबूत केले आहे.
मुंबईची आघाडीची फळी बऱ्याचशा सामन्यांमध्ये समर्थपणे आक्रमण करू शकलेले नाही. पुण्याच्या दुबळ्या माऱ्यासमोरसुद्धा वेस्ट इंडिजचा सलामीवीर ड्वेन स्थिम भोपळा फोडू शकला नाही. अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरसुद्धा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. आतापर्यंतच्या १३ सामन्यांत सचिनची सर्वोच्च धावसंख्या ५४ आहे. त्याला १९.१५च्या सरासरीने फक्त २४९ धावा करता आल्या आहेत. त्या तुलनेत स्मिथ चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने नऊ सामन्यांत २६३ धावा केल्या आहेत.
रोहित फलंदाजीच्या आघाडीवर लढून नेतृत्व करीत आहे. १३ सामन्यांत ५१.८८च्या सरासरीने त्याने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक ४६७ धावा केल्या आहेत. त्याला तोलामोलाची साथ मिळत आहे ती यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिककडून. कार्तिकने दोन अर्धशतकांच्या साहाय्याने १३ सामन्यांत ४०५ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा मारासुद्धा समतोल आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (१९ बळी) आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (११ बळी) जगातील सर्वोत्तम माऱ्याकडे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्याची क्षमता आहे. याचप्रमाणे भारताची फिरकी जोडी हरभजन सिंग (१७ बळी) आणि प्रग्यान ओझा (१४ बळी) मधल्या षटकांमध्ये बळी मिळवून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचे कार्य इमाने-इतबारे करीत आहेत.
दुसरीकडे हैदराबाद सनरायजर्सने सोमवारी विजय मिळविल्यास बाद फेरीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असतील. रविवारी रात्री सनरायजर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ३० धावांनी आरामात विजय मिळवत आपल्या आशा तेवत ठेवल्या. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात सनरायजर्सने मुंबई इंडियन्सला हरविण्याची किमया साधली होती, हेसुद्धा सोमवारच्या लढतीला सामोरे जाताना विसरता कामा नये. हैदराबादने आजमितीपर्यंत मिळविलेले अनेक विजय हे कमी धावसंख्येचे सामने होते. फलंदाजी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.
सनरायजर्सच्या फलंदाजीच्या फळीत दिग्गज फलंदाजांचा समावेश भलेही नसेल, पण त्यांचा गोलंदाजीचा मारा मात्र सर्वोत्तम असा आहे. जगातील अव्वल वेगवान गोलंदाज डेल स्टेन, इशांत शर्मा आणि लेग-स्पिनर अमित मिश्रा त्यांच्या दिमतीला आहेत. याशिवाय अष्टपैलू थिसारा परेरा आणि डॅरेन सॅमी यांचासुद्धा सनरायजर्सच्या या यशात मोलाचा वाटा आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर संघात आलेल्या सलामीवीर शिखर धवनने प्रारंभी सामने जिंकून देणारी चांगली कामगिरी बजावली. पण मागील काही सामन्यांत तो धावांसाठी झगडताना आढळत आहे. सलामीवीर आणि यष्टीरक्षक पार्थिव पटेलला तीन वर्षांनंतर प्रथमच मागील सामन्यात अर्धशतक झळकावता आले आहे. हैदराबादला बाद फेरीकडे वाटचाल करायची असल्यास त्यांच्या दोन्ही सलामीवीरांना आक्रमकतेने जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. याशिवाय चार परदेशी खेळाडूंचा नियम हैदराबादसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून व्हाइट यांच्याकडे त्यांना कर्णधारपद आलटून-पालटून द्यावे लागत आहे. दुर्दैवाने दोन्ही कप्तान फलंदाज म्हणून अपयशी ठरले आहेत. व्हाइटने नऊ सामन्यांत एका अर्धशतकासह १३३ धावा केल्या आहेत, तर संगकाराने नऊ सामन्यांत १२० धावा केल्या आहेत.
सामना : मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद.
स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई.
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

Story img Loader