Mumbai Indians Hardik Pandya Gujrat Titans Trade IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबईने काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सशी हार्दिक पंड्याचा ट्रेडऑफ केला होता. या ट्रेडनंतर संघात वापसी करण्यासाठी हार्दिक पंड्याला १५ कोटी रुपयाचं मानधन आणि कर्णधार पद देऊ करण्यात आले होते. यानंतर आता इंडियन एक्सस्प्रेसने मुंबई व गुजरातच्या संघामध्ये झालेल्या व्यवहाराविषयी सविस्तर अहवाल मांडला आहे. यानुसार, मुंबई इंडियन्सच्या संघाकडून गुजरात टायटन्सला हार्दिक पांड्याला रिलीज करण्यासाठी मोठी रक्कम दिली असल्याचे समजतेय.
इंडियन एक्सस्प्रेसच्या अहवालानुसार ठोस रक्कम समोर आली नसली तरी ही रक्कम साधारण १०० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जातेय. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये आताच समाविष्ट करण्याचे मुख्य कारण म्हणजे २०२५ मधील स्पर्धेचा मेगा लिलाव. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या भविष्यासाठी संघाचा पाया मजबूत होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच संघ व्यवस्थापन माजी कर्णधार रोहित शर्मासह त्याच्या कारकिर्दीच्या कालावधीतच, संघाचे नेतृत्व करू शकेल अशी व्यक्ती शोधत होतं. यासाठीच पंड्याची निवड हा एक व्यवहार्य निर्णय होता.
शिवाय, पांड्याच्या विक्रीमुळे गुजरात टायटन्सलाही अनेक प्रकारे मदत झाली. २०२१ मध्ये, CVC कॅपिटलने IPL चा भाग होण्यासाठी ५,६२५ कोटी रुपयांचं बजेट ठेवलं होतं. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे संघ मालक अंबानी आहेत. दोन्ही गटांची आर्थिक क्षमता पाहता पंड्याच्या व्यापार करारामुळे गुजरातच्या पर्समध्ये १५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पंड्याच्या डीलमधून मिळालेली कमाई आर्थिक वर्षाच्या शेवटी CVC कॅपिटलच्या ताळेबंदात दिसून येईल आणि यामुळे त्याच्या मूल्यांकनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
२०२० मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांचे शेवटचे आयपीएल विजेतेपद जिंकले होते, दोन-तीन वर्षांच्या विस्मरणानंतर स्पर्धेच्या १७ व्या आवृत्तीत चांगली कामगिरी करण्यासाठी संघ उत्सुक असेल.
पण पंड्या खेळणारच नाही का?
दरम्यान, पंड्याला २०२३ च्या विश्वचषकादरम्यान घोट्याला दुखापत झाली होती आणि अखेरीस स्पर्धेतून तो बाहेर पडला होता.जानेवारीच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा असताना, पीटीआयमधील एका अहवालात असे सुचवण्यात आले आहे की अद्याप पंड्याच्या प्रकृतीत हवा तसा बदल दिसून आलेला नाही, ज्यामुळे पंड्याला अफगाणिस्तानची मालिका तर सोडावी लागूच शकते पण बहुचर्चित ‘मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावर’ असूनही खेळण्याची संधी गमवावी लागू शकते.