2019 साली होणारं आयपीएल लक्षात घेता मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी-कॉकला संघात जागा दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत खेळाडू हस्तांतरणाचा करार करुन मुंबई इंडियन्सने डी कॉकला संघात स्थान दिलं. यानंतर मुंबईचं संघ व्यवस्थापन भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनलाही संघात जागा देण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी सनराईजर्स हैदराबाद संघाच्या प्रशासनाशी बोलणी सुरु असल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्राने दिलं आहे.
अवश्य वाचा – क्विंटन डी कॉक आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार
मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार शिखर धवन हा हैदराबाद संघाकडून खेळण्यासाठी आता उत्सुक नसून त्याने आपल्याला करारातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. प्रशिक्षक टॉम मूडी यांच्यासोबत शिखर धवनचे मतभेद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. करारानुसार शिखर धवनने पुढची 3 वर्ष हैदराबाद संघाकडून खेळणं अपेक्षित आहे, मात्र सध्याच्या घडामोडी पाहता हैदराबादचे संघ मालक शिखरला करारातून मोकळं करण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही.
सनराईजर्स हैदराबाद संघाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर धवनच्या मोबदल्यात संघ प्रशासन किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघातले दोन चांगले खेळाडू घेण्याच्या विचारात आहे. यासाठी संघ मालकांमध्ये बोलणीही सुरु आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सही धवनला आपल्या ताफ्यात सामावून घेण्यास उत्सुक आहे, त्यामुळे वन-डे सामन्यात भारतासाठी सलामीला येणारी गब्बर-हिटमॅनची जोडी मुंबई इंडियन्सकडूनही डावाची सुरुवात करते का याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.