Rohit Sharma Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ पूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळं करून नेतृत्व आता हार्दिक पंड्याच्या हाती सोपवलं आहे. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्समधून पुन्हा एमआय मध्ये घेतल्यापासूनच याविषयी चर्चा सुरु होती, मात्र शुक्रवारी यावर मुंबई इंडियन्सतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आला. कल्पना असूनही काहीसा धक्कादायक ठरलेला हा निर्णय चाहत्यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे अगदी सोशल मीडियापासून ते प्रत्यक्षही अनेकांनी मुंबई इंडियन्सवर कडकडून टीका केली आहे.
काही पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्माला या बदलाबाबत काहीच कल्पना नव्हती व जेव्हा रितिका (रोहित शर्माची पत्नी) हिने एमआयची पोस्ट पाहिली तेव्हा त्याला हे समजलं. रोहित शर्माच्या वतीने याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. मात्र, इंडियन एक्सस्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माला वर्ल्डकपच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून आगामी हंगामासाठी परत आणण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्याने गुजरातमधून मुंबईत पुन्हा येण्यासाठी एका अटीवर सहमती दर्शवली होती ती म्हणजे, त्याला फ्रँचायझीचा कर्णधार बनवले जाईल.
शुक्रवारी, मुंबई इंडियन्सचे ग्लोबल परफॉर्मन्स हेड, महेला जयवर्धने यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “हा वारसा तयार करण्याचा एक भाग आहे आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याच्या मुंबई इंडियन्सच्या तत्वाचे पालन करण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच प्रभावशाली नेतृत्व लाभले आहे, ज्यांनी यशात योगदान देत भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. या तत्वज्ञानाला अनुसरून हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवणार आहे.”
प्रसिद्धिपत्रकात पुढे म्हटले आहे की, “आम्ही रोहित शर्माच्या उल्लेखनीय नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो; २०१३ पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ हा असामान्य होता. त्याच्या नेतृत्वाने संघाला केवळ अतुलनीय यशच मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान पक्के केले आहे.”
२०१३ मध्ये, रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खराब सुरुवात केल्यानंतर, फ्रँचायझीने रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले ज्यामुळे पहिल्याच लीगमध्ये विजय एमआयच्या खात्यात जोडला गेला. त्यानंतरही रोहितने संघाला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले
दुसरीकडे, हार्दिक पंड्या, मुंबई इंडियन्सचा संघ सोडून २०२१ मध्ये गुजरात टायटन्समध्ये प्रवेश घेऊन कर्णधार झाला होता, त्यानेही गुजरातला पहिल्याच वर्षी जेतेपद मिळवून दिले, सीएसके सारख्या बलाढ्य संघासमोर मिळवलेला विजय आणखीनच खास ठरला. यंदाच्या आयपीएल लिलावाच्या पूर्वी जेव्हा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या संघात परतला, तेव्हा त्यानेही या घरवापसी बद्दल आनंद व्यक्त केला होता. “२०१५ पासून माझा मुंबई इंडियन्ससह क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आता पुन्हा मुंबईत आल्यावर १० वर्षांचा संपूर्ण कालावधी डोळ्यासमोरून जातो आणि तो माझ्यासाठी खूप खास आहे. मी जिथून सुरुवात केली तिथेच आलो आहे.” असं पंड्या म्हणाला होता.