तब्बल १० वर्षं मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद यशस्वीपणे सांभाळणारा रोहित शर्मा पदावरून पायउतार होताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. एकीकडे मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा कायमच आमचा कर्णधार राहील, अशी भावनिक पोस्ट शेअर केली असताना नेटिझन्सला मात्र संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय फारसा पटलेला दिसत नाही. त्यामुळे हा निर्णय जाहीर झाल्यानंतर पहिल्या तासाभरातच मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचा फटका बसला आहे. मोठ्या संख्येनं चाहते मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्राम अकाऊंट अनफॉलो करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच हार्दिक पंड्याला खेळाडू अदलाबदलीमध्ये मुंबई इंडियन्सनं खरेदी केलं. हार्दिक गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोडून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेक जाणकारांनी तेव्हाच हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईल, असा अंदाजही व्यक्त केला होता. अखेर तेच खरं ठरलं असून चाहत्यांसाठी मात्र हा धक्का ठरल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.
तासाभरात चार लाख फॉलोअर्सचा फटका
हार्दिक पंड्याचं नाव मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जाहीर होताच पहिल्या तासाभरात त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. तब्बल चार लाख चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्राम अकाऊंट अनफॉलो केलं असून त्यात अधिकाधिक भरच पडताना दिसत आहे. दुसरीकडे एक्सवरही (ट्विटर) असंच काहीसं चित्र दिसत आहे.
मुंबई इंडियन्सच्या वेबसाईटवरही प्रतिक्रिया
दरम्यान, एकीकडे मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया खात्यांवर चाहत्यांचा रोष दिसून येत असताना वेबसाईटवरही रोहित शर्माच्या चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करावं, अशी मागणी करणाऱ्या असंख्य पोस्ट वेबसाईटवर दिसून येत आहेत. त्याशिवाय, हार्दिक पंड्या कर्णधारपद सांभाळू शकणार नाही, अशाही काही पोस्ट दिसून येत आहेत. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधार करणं चाहत्यांना फारसं रुचलेलं नसल्याचंच दिसून येत आहे.
रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सची पोस्ट
हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाची घोषणा केल्यानंतर दुसरीकडे मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून आत्तापर्यंतच्या वाटचालीचा प्रवास दर्शवणारा व्हिडीओही आहे. शिवाय तू कायमच आमचा कर्णधार राहशील, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.