WPL 2025 Winner Mumbai Indians Prize Money: WPL 2025 च्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ धावांनी पराभव करत थरारक विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा या स्पर्धेचा विजेता ठरला. अंतिम फेरीत मुंबईने महत्त्वाच्या क्षणी विकेट घेतल्या. याच कारणामुळे दिल्लीच्या संघाला छोट्या लक्ष्याचाही यशस्वी पाठलाग करता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १४९ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ केवळ १४१ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सला विजयानंतर किती बक्षिसाची रक्कम मिळाली जाणून घ्या.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दुसरे WPL जेतेपद पटकावले आहे. याआधी २०२३ मध्येही मुंबई संघ दिल्ली कॅपिटल्सला हरवून चॅम्पियन बनला होता. मुंबईने WPL च्या पहिल्याच सीझनचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या नशीबाने त्यांना यंदाही साथ दिली नाही. दिल्लीचा संघ सलग तीन वर्षे पहिल्या स्थानी येत अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण संघाला पराभवाला सामोर जावे लागले. दिल्लीचा संघ लीग टप्प्यात चांगली कामगिरी करतो, पण फायनलमध्ये संघाला निराशेला सामोर जावे लागले आहे.

आतापर्यंत डब्ल्यूपीएलचे तीन हंगाम झाले आहेत आणि तिन्ही वेळा दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु ते एकदाही विजेतेपद मिळवू शकले नाही. प्रत्येक वेळी विजेतेपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला ६ कोटी बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे तर मुंबईविरूद्ध फायनल गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ कोटी बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. मागच्या वेळीही विजेत्या आणि उपविजेत्याला हिच बक्षीस रक्कम देण्यात आली होती. तर मुंबई इंडियन्सची फलंदाज नॅट स्किव्हर ब्रंटला सीझनमध्ये सर्वाधिक ५२३ धावा केल्याबद्दल ऑरेंज कॅप देण्यात आली. तर मुंबईची फिरकीपटू अमेलिया कर हिला पर्पल कॅप देण्यात आली जिने १८ विकेट्स घेतले.

WPL 2025 च्या अंतिम सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हरमनप्रीत कौरने मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली. तिने अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. हरमनप्रीतने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा केल्या.

नॅट स्किव्हर ब्रंटने ३० धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच मुंबई संघाला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून मेरीजेन कॅपने सर्वाधिक ४० धावा केल्या. निक्की प्रसादने २५ धावांचे योगदान दिले, मात्र हे खेळाडू दिल्ली संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरले.

Story img Loader