गतविजेत्या मुंबई इंडियन्सची अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी ‘इंच इंच लढवू..’ या आवेशात शर्थ सुरू आहे. मुंबई इंडियन्सने साखळीमधील उर्वरित दोन्ही लढती जिंकल्या आणि समीकरणाचे नशीब जुळले, तर मुंबईला बाद फेरी गाठणे मुळीच अशक्य नाही. मुंबईचा पहिला पेपर हा त्या तुलनेत अतिशय सोपा आहे. त्यामुळे आयपीएलच्या सातव्या मोसमात झगडणारा संघ म्हणून ओळख जपणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शुक्रवारी मुंबई इंडियन्स आरामात नामोहरम करू शकेल.
बुधवारी रात्री लसिथ मलिंगा आणि हरभजन सिंग या भरवशाच्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीतसुद्धा मुंबईने कमाल केली. मोहालीत किंग्ज इलेव्हन पंजाबसारख्या तगडय़ा संघाला सात विकेट राखून धूळ चारली. त्यामुळे अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवण्याच्या मुंबईच्या आशा बळावल्या आहेत.
मुंबईचा संघ पुन्हा वानखेडे स्टेडियमच्या आपल्या बालेकिल्ल्यावर परतला आहे, तो असंख्य आशा-आकांक्षा घेऊन. वानखेडेवरील मागील ११ सामन्यांतील एकमेव पराभव वगळला तर या मैदानाने मुंबई इंडियन्सच्या मागील हंगामातील आयपीएल जेतेपदातही सिंहाचा वाटा उचलला आहे. कर्णधार रोहित शर्मासाठी नेमकी हीच गोष्ट अनुकूल असेल. त्यामुळे गुणतालिकेत सध्या सहाव्या स्थानावर असूनही, आपला संघ प्ले-ऑफचे स्वप्न पूर्ण करू शकेल, यावर शर्माचा विश्वास आहे.
संयुक्त अरब अमिरातीमधील पहिला टप्पा मुंबई इंडियन्ससाठी वाईट ठरला; परंतु भारतात परतल्यावर हा संघ अनपेक्षितपणे सावरला. वेस्ट इंडिजच्या लेंडल सिमॉन्सला संघात घेण्याचा निर्णय मुंबईसाठी फायदेशीर ठरल्याचा प्रत्यय येत आहे. पंजाबविरुद्ध त्याने यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिलेवहिले शतक नोंदवण्याची किमया साधली. मागील पाच डावांमध्ये ३८, ६८, १२, ६२ आणि नाबाद १०० अशा धावा २९ वर्षीय सिमॉन्सच्या बॅटमधून साकारल्या आहेत.

Story img Loader