पीटीआय, लखनऊ
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, मंगळवारी मुंबई इंडियन्स संघासमोर लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताची संघनिवडही आज अपेक्षित आहे. त्यामुळे लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या दमदार कामगिरी करून भारतीय संघातील स्थानासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यापूर्वीच भारताची संघनिवड झाली आणि या दोघांना किंवा एकाला संघात स्थान न मिळाल्यास निवड समितीला चुकीचे ठरवण्याचा ते प्रयत्न करतील.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये राहुलच्या स्ट्राईक रेटबाबत नेहमीच चर्चा केली जाते. तो डावाच्या सुरुवातीला बराच वेळ घेत असल्याने अनेकदा त्याच्यावर टीकाही झाली आहे. या हंगामात मात्र त्याने खेळण्याच्या शैलीत काहीसा बदल केला आहे. यंदा त्याने १४४.२७च्या स्ट्राईक रेटने ३७८ धावा केल्या आहेत. असे असले तरी स्ट्राईक रेटच्या बाबत तो ऋषभ पंत (१६०.६०) आणि संजू सॅमसन (१६१.०८) यांच्याहून बराच मागे आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पंतचे भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित समजले जात आहे. दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी राहुल आणि सॅमसन शर्यतीत आहेत.
हेही वाचा >>>KKR vs DC : सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ
दुसरीकडे, मुंबईचा कर्णधार हार्दिकने यंदाच्या हंगामात निराशा केली आहे. अष्टपैलू म्हणून त्याला फारशी चमक दाखवता आली नसून कर्णधार म्हणूनही त्याने बऱ्याच चुका केल्या आहेत. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्याचे भारतीय संघातील स्थान निश्चित नाही. आता लखनऊविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी हार्दिक उत्सुक असेल.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप.