शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. हातातून सामना निसटणार अशी परिस्थिती असतानाही मुंबईने पुनरागमन करत चेन्नईचा पराभव केला. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून त्याला सुरुवात झाली. विशेष म्हणजे यावेळी पुणेरी ढोलाच्या तालात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया येथून मिरवणुकीला सुरुवात झाली असून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ही मिरवणूक चालणार आहे. विजेत्या संघाला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

ही मिरवणूक जसलोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून ट्रायडंट हॉटेलच्या दिशेने येणार आहे. यानंतर रात्री अँटिलिया येथे पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विजयी संघातील खेळाडूंसहित सेलिब्रेटीही उपस्थित असतील.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले.

Story img Loader