MI beat DC in WPL 2025 Final by 8 Runs: मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा WPL चे जेतेपद पटकावले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला. मुंबईच्या संपूर्ण संघाने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयात आपले योगदान दिले. दिल्लीच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत येऊन विजयापासून दूर राहिला आहे. दिल्लीच्या पदरी सलग तिसऱ्यांदा निराशा पडली आहे. मुंबई इंडियन्स संघ WPL मध्ये दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला.
दिल्ली कॅपिटल्सने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि निर्धारित २० षटकांत १४९ धावा केल्या. पण अंतिम फेरीत मुंबई संघाची सुरूवात फारच खराब झाली. मुंबईने पहिल्या २ षटकांत फक्त ५ धावा केल्या. तर १४ धावांवर हिली मॅथ्यूज आणि यस्तिका भाटियाच्या विकेट्स गमावल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी ६२ चेंडूत ८९ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला.
नताली स्किव्हर ब्रंट यंदाच्या मोसमात शानदार फॉर्मात आहे पण ती त्यापद्धतीने धावा करू शकली नाही. पण तिने हरमनला चांगली साथ दिली आणि २८ चेंडूत ४ धावा करत ३० धावा करत बाद झाली. तर हरमनप्रीत कौर ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा करत शानदार खेळी केली. यानंतर जी कमालिनीने १० धावा, अमनजोत कौरने १४ धावा आणि संस्कृती गुप्ताने ८ धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. दिल्लीकडून मारिज कापने ४ षटकांत ११ धावा देत २ विकेट्स घेतले. तर जेस जोनासनने २ विकेट, चारणीने २ विकेट्स आणि सदरलँडने १ विकेट घेतली.
मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ९ विकेट्स गमावत १४१ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. मेग लॅनिंग १३ धावा करत नतालीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. तर शफाली वर्मा ४ धावा करत बाद झाली. जेस जोनासन १३ धावा करत बाद झाली. यानंतर जेमिमा रोड्रीग्जने ३० धावा करत संघाचा डाव सावरला.
तर एनाबेल सदरलँड २ धावा आणि सारा ब्राईस ५ धावा करत धावबाद झाली. यानंतर मारिजन कापने एक अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. मारिजन काप २६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या आणि संघाला विजयाचं जवळ नेलं. यानंतर निक्की प्रसादनेही २५ धावांची खेळी केली. पण पुन्हा एकदा दिल्लीला नशीबाने साथ दिली नाही.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मुंबईकडून नताली स्किव्हर ब्रंटने ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतले. तर अमेलिया करने २ विकेट्स, हिली मॅथ्यूज, शबनम स्माईल आणि साईका इशाक यांनी एक-एक विकेट घेतली.