मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची निवडणूक २५ ऑगस्ट रोजी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे होणार आहे. विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांनी अलीकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीची घोषणा केली.

निवडणुकीची अधिसूचना संलग्न संस्था प्रतिनिधींना पाठवण्याच्या कामाला वेग आला असून लवकरच या संबंधीचे परिपत्रक सर्वाना पाठवण्यात येईल. डॉ. संतोष कुमार जैसवाल (निवृत्त न्यायाधीश) आणि रवींद्र देसाई हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन विद्यमान प्रमुख कार्यवाह विश्वास मोरे यांनी सर्वाना केले आहे.

अमोल कीर्तिकर उपनगरच्या अध्यक्षपदी

गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकारी समिती सदस्यांनी अमोल कीर्तिकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. रविवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अमोल यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

Story img Loader