मुंबई शहर कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या प्रत्येक संघाला प्रो-कबड्डी लीगचे एक तिकीट मिळणार आहे. मुंबईत २६ ते २९ जुलै या कालावधीत होणाऱ्या प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या दिवशी मुंबईतील प्रत्येक संघाला एक तिकीट देण्यात येईल आणि त्याचा आर्थिक भार असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी उचलला आहे. रविवारी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ताळेबंद, अंदाजपत्रक इत्यादी विषयांवर सभासदांनी सुचवलेल्या सूचना आणि दुरुस्तीसह मंजुरी देण्यात आली.
याचप्रमाणे रेल्वेच्या खेळाडूंची जिल्ह्याच्या प्रातिनिधिक संघात निवड करून राज्य अजिंक्यपद स्पध्रेत खेळण्यास परवानगी मिळाली तर राज्याचा संघ अधिक बलवान होतील, असा प्रस्ताव मांडण्यात आला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी चर्चा करून यातून मार्ग काढता येईल, असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले.
‘‘मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाचा विषय कार्यक्रमपत्रिकेवर होता. परंतु धर्मादाय आयुक्तांकडे मागील निवडणुकीचा खटला चालू असल्यामुळे त्यांच्या परवानगीनंतरच या तारखा निश्चित होऊ शकतील,’’ अशी माहिती असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मनोहर इंदूलकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा