खेळाबरोबरच सर्वागसुंदर व्यायाम हा लंगडीचा पाया आहे. मात्र अन्य खेळांच्या भाऊगर्दीत लंगडीचे स्थान मागे पडते आहे. परंतु हा खेळ नक्की काय आहे, त्याचे नियम काय आहेत, खेळाडूंची कामगिरी याविषयी सखोल माहिती देण्यासाठी मुंबई जिल्हा लंगडी संघटनेने अनोखे पाऊल उचलले आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून लंगडी खेळाचा इतिहास, खेळाचे नियम, स्पर्धाची माहिती, खेळाडूंची कामगिरी असा समग्रकोशच मांडण्यात येणार आहे. सध्या संकेतस्थळाच्या निर्मित्तीचे काम सुरू असून महिन्याभरात हे संकेतस्थळ इंटरनेटवर सर्वासाठी उपलब्ध होणार आहे.
मुंबई जिल्हा लंगडी संघटनेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अरुण देशमुख यांनी सांगितले की, ‘‘या संकेतस्थळाद्वारे सुसंवाद व्हावा यासाठी ते इंटरअ‍ॅक्टिव्ह स्वरुपाचे असणार आहे. विविध स्पर्धाच्या छायाचित्रांसह व्हिडिओही संकेतस्थळावर असणार आहे. स्पर्धासाठी प्रवेशिका आणि नोंदणी या संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. ‘फेसबुक’वर मुंबई लंगडी संघटना उपलब्ध आहे. मात्र यापेक्षा सविस्तर माहितीकरिता संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. राज्यातर्फे खेळणारे मुंबईकर खेळाडू, त्यांची स्पर्धागणीक कामगिरी, राष्ट्रीय खेळाडू, मान्यवर प्रशिक्षक अशा विविध माहितीने हे संकेतस्थळ परिपूर्ण असणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये संकेतस्थळ उपलब्ध होणार आहे.’’
‘‘लंगडी हा खेळ वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो. संकेतस्थळामुळे खेळाबद्दलची माहिती जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध होऊ शकेल. २०१०मध्ये लंगडीच्या राष्ट्रीय संघटनेला कायदेशीर मान्यता मिळाली. आता या खेळाचा प्रसार आणि प्रचार संकेतस्थळाद्वारे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे मुंबई लंगडी संघटनेचे कोषाध्यक्ष बाळ तोरसकर यांनी सांगितले.

Story img Loader