झहीर खानच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील आपल्या चौथ्या सामन्यात विदर्भाविरुद्धही वर्चस्व राखण्याचे मनसुबे आखले आहेत.
हरयाणा आणि पंजाबविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांतीन विजयानंतर मुंबईत झालेली दिल्लीविरुद्धची लढत मुंबईने अनिर्णीत राखली होती. त्यामुळे १३ गुणांसह मुंबईचा संघ ‘अ’ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तथापि, हरयाणावरील एकमेव विजयासह, दोन सामने अनिर्णीत आणि एक पराभव पत्करणारा विदर्भाचा संघ ८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कागदावर भक्कम दिसणारा मुंबईचा संघ विदर्भावर आरामात विजय मिळवू शकेल. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणारा वेगवान गोलंदाज झहीर, हरहुन्नरी फलंदाज अजिंक्य रहाणे मुंबईची ताकद भक्कम करतात. अनुभवी फलंदाज वसिम जाफर, कौस्तुभ पवार, आदित्य तरे, सिद्धेश लाड हे फलंदाज फॉर्मात आहेत. याचप्रमाणे तीन सामन्यांत १७ बळी घेणारा विशाल दाभोळकर आणि झहीरवर मुंबईच्या गोलंदाजीची मदार असेल.

Story img Loader