एके काळी मुंबई महापौर चषक कबड्डी स्पध्रेची शान होती, रुबाब होता. पण काळानुसार आर्थिक गणिते न बदलल्यामुळे फक्त सोपस्कार म्हणून संयोजकांकडून स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पध्रेसाठी मुंबई महानगरपालिकेची तरतूद आहे साडेपाच लाख रुपयांची. इतक्या कमी पैशात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचे शिवधनुष्य पेलणे संघटकांसमोर दरवर्षी आव्हानच ठरत आहे. आपल्या शेजारचीच ठाणे महानगरपालिका महापौर चषक कबड्डी स्पध्रेसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करते, हा फरक नक्कीच आश्चर्यकारक आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना सत्तेवर आली, तेव्हा कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या तीन मैदानी खेळांच्या महापौर चषक स्पर्धाची सुरुवात झाली. परंतु कालांतराने आर्थिक गाडी धीम्या गतीने चालू लागल्यामुळे या स्पध्रेची रया गेली आहे. महापौर क्रीडा स्पर्धामध्ये आणखी बऱ्याच खेळांचा समावेश करण्यात आल्यामुळे अखेर कबड्डीच्या वाटय़ाला फक्त पाच लाख रुपयेच येऊ लागले. या वर्षी महापौर रमेश प्रभू यांच्या प्रयत्नांमुळे ही तरतूद साडेपाच लाखांपर्यंत गेली. परंतु तरीही या पैशात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धाच काय, राज्यस्तरीय स्पर्धा घेणेही कठीण असल्यामुळे शेवटी मुंबईचे कबड्डी संघटकच स्पध्रेची आर्थिक तरतूद करून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करीत आहेत. नुकत्याच कोल्हापूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेसाठी महाराष्ट्र शासनाची ५० लाख रुपयांची तरतूद होती, तर मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेला फक्त साडेपाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे गणित नक्कीच विचार करण्याजोगे आहे. नवी मुंबई आणि पुणे महानगरपालिका महापौर चषक कबड्डी स्पध्रेसाठी अंदाजे १० लाख तर नाशिक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका २० लाखांहून अधिक आर्थिक तरतूद करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा