वर्षांखेरीस भारताच्या दौऱ्यामध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यामध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये न्यूझीलंडने एक दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूनिशी खेळावा, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली होती. गेल्या आठवडय़ात दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीनंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती.
‘बीसीसीआयने मांडलेली दिवस-रात्र कसोटीची कल्पना खेळासाठी लाभदायक अशीच आहे. पण त्यासाठी खेळाडूंचाही विचार करावा लागेल, त्यांच्याशी सल्लामसलत करावी लागेल. पण दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारत सकारात्मक आहे. आमच्या मते दिवस-रात्र कसोटी सामन्यांना चांगले भविष्य आहे,’’ असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाइट यांनी सांगितले.
भारतामधील सर्वोत्तम मैदानांमध्ये मुंबईच्या वानखेडेची गणना होते. त्यामुळे हा सामना मुंबईत खेळवण्यात येणार असल्याची शक्यती वर्तवली जात आहे. पण दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी भारतामध्ये प्रायोगिक तत्त्वावर गुलाबी चेंडूंनिशी
स्थानिक सामने खेळवले जाणार आहेत.
‘न्यूझीलंडच्या दौऱ्यादरम्यान गुलाबी चेंडूनिशी दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्याचा आमचा मानस आहे. त्यापूर्वी दुलीप करंडकाचा सामना दिवस-रात्र कसोटीची रंगीत तालीम म्हणून आम्ही खेळवण्याचा विचार करत आहोत,’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये गेल्या वर्षी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना अ‍ॅडलेड येथे खेळवण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांमध्येच जिंकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा