Sachin Tendulkar lodges a Police complaint : इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका जाहिरातीत टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकरचं नाव, आवाज आणि छायाचित्र वापरण्यात आलं होतं. एका व्हिडीओला सचिनचा आवाज देऊन मिम्सही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. या गंभीर प्रकरणाची सचिनने दखल घेतली असून मुंबई क्राईम ब्रॅंचकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आलीय. खोट्या जाहिरातीत सचिनच्या नावाचा मजकूर वापरून फसवणूक करणाऱ्यांविरोधात सचिनने कठोर पाऊल उचललं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात आयपीसीच्या सेक्शन ४२६, ४६५ आणि ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्या जाहिरातीत सचिनचं नाव, आवाज आणि छायचित्र वापरण्यात आलं आहे, ती जाहिरात सचिनहेल्थ डॉट इनच्या नावाने प्रसारित करण्यात आली आहे. या बेवसाईटच्या माध्यमातून ही जाहिरात व्हायरल करण्यात आलीय. या जहिरातीत औषधी उत्पादनांचा प्रचार केला जात असून यामध्ये सचिनचा संबंध असल्याचं दाखवण्यात येत आहे. तसंच नागरिकांची फसवणू केली जात आहे. ही जाहिरात बेकायदेशीरपणे प्रसारित करण्यात आली असून सचिनच्या परवानगीशिवाय त्याच्या नावाचा उल्लेख यामध्ये केलेला आहे.