सलामीवीर आदित्य तरेचे नाबाद शतक आणि वसिम जाफर व रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार सुरुवात केली असून, पहिल्या दिवशी २ बाद ३०६ अशी मजल मारली आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजी पोषक खेळपट्टीवर मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजांनी या निर्णयाचा चांगलाच फायदा उठवला. वसिम जाफर आणि आदित्य तरे यांनी १३५ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. जाफरने या वेळी ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७९ धावांची खेळी साकारली. जाफर बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने (२४) मात्र अपेक्षाभंग केले, पण त्यानंतर आदित्य आणि रोहित शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि संघाची गाडी पुन्हा रुळावर आणली. आदित्यने या वेळी संपूर्ण दिवस फलंदाजी करत २६२ चेंडूंमध्ये १८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १२२ धावांची खेळी साकारली, तर रोहितने ११० चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी साकारत आदित्यला सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत २ बाद ३०६ (आदित्य तरे नाबाद १२२, वसिम जाफर ७९, रोहित शर्मा नाबाद ७२; सौऱ्या सनानदिया १/५६)