प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या दिवशी यु मुंबा आणि पुणेरी पलटण या दोन्ही महाराष्ट्राच्या संघांना पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सकडे सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना चार गुणांची आघाडी होती. दिग्गजांचा समावेश असलेल्या यु मुंबाचा रुबाब पाहता सामन्याचे चित्र पालटणे त्यांच्यासाठी कठीण नव्हते; परंतु शैलीदार चढायांसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या जसवीर सिंगने तीन गुण मिळवत जयपूर हरणार नाही, याची खात्री केली. मग रिशांक देवाडिगाची पकड करून जयपूरने यु मुंबावर लोण चढवला आणि २७-१८ अशा विजयासह शानदार प्रारंभ केला.
जयपूर-मुंबई सामन्यातील पहिल्या सत्रात जयपूरने १०-९ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसरे सत्र अधिक नाटय़पूर्ण ठरले. क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या पकडी करणारा रोहित राणा (९ गुण) जयपूरच्या विजयाचा नायक ठरला. त्याला जसवीर सिंग आणि सोनू नरवालच्या चढायांची सुरेख साथ लाभली. यु मुंबाचा अनुभवी खेळाडू राकेश कुमारने ८ चढाया केल्या. यात त्याला फक्त दोन गुण मिळवता आले, मात्र तीनदा त्याची पकड झाली.
दुसऱ्या सामन्यात अखेरच्या चढाईवर राहुल चौधरीने निर्णायक गुण मिळवत तेलुगू टायटन्सला २७-२६ असा विजय मिळवून दिला. मनजित चिल्लर आणि अजय ठाकूरच्या समावेशामुळे बळकट झालेल्या पुणेरी पलटणने टायटन्सला अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली. दोन मिनिटे बाकी असताना तेलुगू टायटन्सचा संघ एका गुणाने पिछाडीवर होता. मात्र सुकेश हेगडेने दोन गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुण्याच्या योगेश हुडाने एक गुण मिळवत संघाला बरोबरी साधून दिली; परंतु चौधरीने यजमानांना घरच्या मैदानावर विजय साजरा करण्याची संधी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा