मुंबई रायडर्सने सांगली स्मॅशर्सचा पाच मिनिटे राखून ११-१० असा पराभव करताना सलग चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह मुंबई रायडर्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला. ठाणे थंडर्सने अखेरच्या सामन्यातही जोरदार खेळ करत सबर्बन योद्धाजचा १९-१३ असा धुव्वा उडवत खो-खो प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. अहमदाबाद हिरोजनी पुणे फायटर्सचा १४-१३ असा पाडाव केला. उपांत्य फेरीत ठाणे थंडर्सची गाठ पुणे फायटर्सशी पडेल तर मुंबई रायडर्सला अंतिम फेरी गाठण्यासाठी अहमदाबाद हिरोजना नमवावे लागेल.
मुंबई आणि सांगली यांच्यातील लढत एकतर्फी झाली. मुंबईकडून सुरेश सावंत आणि मिलिंद चावरेकर यांनी प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण केले तर मनोज पवार दुसऱ्या डावात २.५० मिनिटे सांगलीच्या संरक्षकांच्या तावडीत सापडला नाही. मिलिंद, सुरेश आणि सुनील मोरे यांनी दोन बळी मिळवत मुंबईच्या विजयात मोलाटा वाटा उचलला. ठाण्याने सबर्बन योद्धाजवर सहज विजय मिळवला. ठाण्याच्या उत्तम सावंतने पहिल्या डावात तीन मिनिटे संरक्षण करून चार बळी मिळवले.

Story img Loader