Saurabh Walker Selection in New Zealand Team: यंदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ भारतात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आता न्यूझीलंडने या मेगा टूर्नामेंटसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा संघ गेल्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेता होता. त्यांनी भारतीय खेळपट्ट्यांबद्दल चांगले ज्ञान असलेल्या व्यक्तीला आपल्या संघाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी किवी संघाने मुंबईचे माजी कामगिरी विश्लेषक सौरभ वॉकर यांची निवड केली आहे.
सौरभचा वॉकरचा कार्यकाळ ३० ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपासून सुरू होणार आहे. मात्र, त्याचे मुख्य काम ५ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या विश्वचषकापासून सुरू होईल. यादरम्यान, तो फिरकीला अनुकूल भारतीय खेळपट्ट्यांनुसार न्यूझीलंड संघ तयार करेल. सौरभ सध्या द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत जोस बटलरच्या नेतृत्वाखालील मॅन्चेस्टर ओरिजिनल्ससोबत काम करत आहे.
सौरभ न्यूझीलंडसोबतच्या त्याच्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाला, “मी सर्व संघांविरुद्ध, विशेषत: भारताविरुद्ध माझी तयारी सुरू केली आहे. न्यूझीलंड संघ व्यवस्थापन माझ्याकडून भारतीय खेळाडूंबद्दल विशिष्ट माहितीची अपेक्षा असणार आहे. मी मुंबई संघासोबत माझ्या कार्यकाळात रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव आणि इतर अनेक वरिष्ठ खेळाडूंसोबत काम केले आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्यासाठी वनडे विश्वचषकातील गोष्टी अधिक सोप्या करण्याचा माझा प्रयत्न असेल.”
हेही वाचा – The Hundred Women: स्मृती मंधानाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू
भारतीय खेळपट्ट्यांनुसार रणनीती आखणे –
सध्या, सौरभ वॉकर जोस बटलरच्या नेतृत्वाखाली द हंड्रेड मँचेस्टर ओरिजिनल्ससोबत काम करत आहे. सौरभने इंग्लंडमधून मिड-डेला सांगितले की, “विश्वचषकादरम्यान भारतीय खेळपट्ट्या महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे मी त्या पैलूवर लक्ष केंद्रित करेन. रणनीती बनवताना विकेटची भूमिका महत्त्वाची असेल. न्यूझीलंड संघाचा भाग बनणे ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.”
कोण आहे सौरभ वॉकर?
३८ वर्षीय सौरभ वॉकरने ८ वर्ष मुंबई रणजी संघासोबत काम केले आहे. २००६ मध्ये शिक्षण सोडल्यानंतर त्यानी चेन्नईमध्ये स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्समध्ये एक वर्षाचा कोर्स केला आणि त्यानंतर या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याची पहिली टर्म २००७ मध्ये मुंबईत सुरू झाली होती. २०२१ च्या विश्वचषकादरम्यान त्याने मुंबईशिवाय राजस्थान रॉयल्स आणि अफगाणिस्तान संघासोबतही काम केले आहे.