MUM vs MP Ranji Trophy final : बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले आहे. अंतिम सामन्यात शतक साजरे केल्यानंतर सर्फराजने अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला. आपल्या यशाचे सर्व श्रेय त्याने वडील आणि प्रशिक्षक असलेल्या नौशाद खान यांना दिले आहे.
नौशाद खान यांची दोन्ही मुले सर्फराज आणि मुशीर मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतात. त्यापैकी सर्फराज सध्या रणजी स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. अंतिम सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांनी सर्फराज खानशी संवाद साधला. ‘भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे का?’, असा प्रश्न सर्फराजला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्याचे डोळे पाणावले. शतक पूर्ण केल्यानंतरही मैदानात सर्फराज भावूक झाला होता. ‘वडिलांच्या अथक परिश्रमांमुळे मी आज या ठिकाणी पोहचलो आहे,’ असे तो म्हणाला.
नौशाद खान हेच आपल्या दोन्ही मुलांना प्रशिक्षण देतात आणि त्यांचा सरावही घेतात. जेव्हा कोणताही सामना नसतो तेव्हा दोन्ही भाऊ वडिलांच्या देखरेखीखाली दररोज सहा ते सात तास सराव करतात. काही अंतर्गत प्रशासकीय मुद्द्यांमुळे सर्फराजला एका हंगामासाठी उत्तर प्रदेशला जावे लागले होते. मुंबईच्या संघात परत येण्यापूर्वी त्याने काही वेळ ‘कूलिंग ऑफ’ केले. त्यानंतर त्याची पुन्हा मुंबई संघात निवड झाली.
याबाबत बोलताना तो म्हणाला, “माझ्या सोबत काय झाले हे तुम्हा सर्वांना माहित आहे. अब्बू नसते तर मी कधीच संपलो असतो. संकाटाच्या काळात त्यांनी एकदाही माझा हात सोडला नाही. शतकानंतर माझ्या भावाने त्याच्या फोनवर ‘स्टेटस’ ठेवले आहे. त्यात माझे अब्बू प्रचंड आनंदी दिसत आहेत. ते बघून मला समाधान मिळाले.”
सर्फराज हा दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचा चाहता आहे. मुसेवालाची नुकतीच एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली. त्याला श्रद्धांजली म्हणून शतक झळकावल्यानंतर सर्फराजने मुसेवालाच्या शैलीत आनंद साजरा केला.
याबाबत विचारले असता सर्फराज म्हणाला, “खास पद्धतीने शतक साजरे करण्याची कृती ही सिद्धू मूसेवालासाठी होती. मला त्याची गाणी आवडतात. मी आणि यष्टीरक्षक हार्दिक तामोरे त्याची गाणी ऐकतो. मागच्या सामन्यातही मी अशीच कृती केली होती पण हॉटस्टारने ती दाखवली नाही. मी ठरवले होते की जेव्हाही मी दुसरे शतक झळकावेल तेव्हा मी पुन्हा मुसेवालाच्या शैलीत आनंद साजरा करेन.”