पीटीआय, मुंबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) २०२४-२५ च्या हंगामापासून आपल्या रणजी खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामन्याच्या मानधनाइतकेच आणखी मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. या निर्णयामुळे मुंबईच्या रणजी खेळाडूंचे मानधन थेट दुप्पट होणार आहे.

रणजी करंडक स्पर्धेचे महत्त्व वाढवणे आणि ‘एमसीए’ कार्यक्षेत्रात लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांना चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. ‘बीसीसीआय’च्या देशांतर्गत क्रिकेटसाठीच्या मानधनाच्या समान मानधन देण्याचा प्रस्ताव ‘एमसीए’चे अध्यक्ष काळे यांनी मांडला होता आणि तो ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेने एकमताने स्वीकारला.

‘‘पुढील हंगामापासून ‘एमसीए’ खेळाडूला प्रत्येक रणजी करंडक सामन्यासाठी अतिरिक्त मानधन देणार आहे. खेळाडूंची अधिक कमाई व्हावी असे आम्हाला वाटले. यामध्ये विशेषत: रणजी करंडक खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार करण्यात आला. रणजी स्पर्धेसाठी मुंबईकरांच्या मनात विशेष स्थान आहे. त्यामुळे आमच्यासाठी क्रिकेटचे हे प्रारूप महत्त्वाचे आहे,’’ असे काळे म्हणाले.

हेही वाचा >>>IPL 2024 KKR vs SRH: शेवटच्या चेंडूवर कोलकाताने हैदराबाद संघावर साकारला विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा नायक

मुंबईने रणजी करंडक स्पर्धेचे ४२व्यांदा जेतेपद मिळवल्याच्या एका आठवड्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘एमसीए’ने मुंबईच्या विजयानंतर ‘बीसीसीआय’च्या पाच कोटी रुपयांच्या बक्षीस रकमे इतकीच रक्कम संघाला घोषित केली होती. ‘बीसीसीआय’ कडून देण्यात येणाऱ्या मानधनासह अतिरिक्त साहाय्य प्रदान करून तरुण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे ‘एमसीए’चे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले.

बीसीसीआयचे’ सामन्यासाठीचे मानधन

‘बीसीसीआय’ने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील मानधनात २०२१ मध्ये बदल केले. यानुसार, कारकीर्दीत २० हून कमी प्रथमश्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूला दिवसाला ४० हजार (राखीव खेळाडू २० हजार), २१ ते ४० सामने खेळलेल्या खेळाडूला दिवसाला ५० हजार (राखीव खेळाडू २५ हजार) आणि ४० हून अधिक सामने खेळलेल्या खेळाडूला दिवसाला ६० हजार रूपये (राखीव खेळाडू ३० हजार) मानधन मिळते. ‘एमसीए’ने घेतलेल्या निर्णयामुळे आतापर्यंत मुंबईच्या ज्या खेळाडूला सामन्यामागे २.४० लाख रुपये मिळत होते, त्याला पुढील हंगामापासून ४.८० लाख रुपये मिळतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ranji cricketers get same match fee from mca as bcci amy