मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने (५३ धावांत ६ बळी) भेदक गोलंदाजीचा प्रत्यय घडवताना उत्तर प्रदेशचा डाव २०६ धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर मुंबईची ३ बाद ४२ अशी केविलवाणी स्थिती होती. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील ही लढत निर्णायक होण्याचे संकेत दुसऱ्या दिवशीच मिळत आहे.
१ बाद ११५ या धावसंख्येत उत्तर प्रदेशच्या फलंदाजांनी सोमवारी ३४.४ षटकांत फक्त ९१ धावांची भर घातली आणि त्यांचे नऊ फलंदाज माघारी परतले. खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशी एकंदर ५१.४ षटकांचा खेळ होऊ शकला. पण दिवसभरात एकंदर १२ फलंदाज बाद झाले.
सकाळच्या सत्रात ठाकूरने तीन फलंदाजांना झटपट बाद करीत यजमानांना हादरवले. सकाळी पहिल्याच चेंडूंवर ठाकूरने प्रशांत गुप्ताला (४१) तंबूत पाठवले. मग पुढच्याच षटकात त्याने उमंग शर्माला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशची ३ बाद ११५ अशी अवस्था झाली. मग त्याने तन्मय श्रीवास्तवचा (६७) अडसर दूर केला. मग यजमान संघाचे फलंदाज काही अंतराने बाद होत गेले. एकलव्य द्विवेदीने २३ धावा काढल्या.
प्रत्युत्तरादाखल १७ षटकांत मुंबईचे तीन आघाडीचे फलंदाज बाद झाले. अमित मिश्राने (२/१३) दोन्ही सलामीवीरांना तंबूची वाट दाखवली. खेळ थांबला तेव्हा हिकेन शाह १४ धावांवर खेळत होता, तर सूर्यकुमार यादवने आपले खातेदेखील उघडलेले नाही.
संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ८४.४ षटकांत सर्व बाद २०६(तन्मय श्रीवास्तव ६७, प्रशांत गुप्ता ४१, एकलव्य द्विवेदी २३; शार्दुल ठाकूर ६/५३)
मुंबई (पहिला डाव) : १७ षटकांत ३ बाद ४२ (हिकेन शाह खेळत आहे १४; अमित मिश्रा २/१३)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा