दमदार फलंदाजीच्या जोरावर बंगालपुढे विजयासाठी ३९१ धावांचे आव्हान ठेवत मुंबईचा संघ यंदाच्या मोसमात पहिल्यावहिल्या विजयाच्या वाटेवर आहे. हिकेन शाहचे सलग तिसरे शतक आणि अभिषेक नायरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी ४० मिनिटे आधी मुंबईने दुसरा डाव ५ बाद २९४ धावांवर घोषित केला आणि बंगालला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईला पहिल्यावहिल्या विजयासाठी सामन्याच्या अखेरच्या १० बळींची गरज आहे. बंगालचे मात्र गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर सामना अनिर्णीत राखण्याचे ध्येय असेल. बंगालने तिसऱ्या दिवसअखेर एकही विकेट न गमावता ४७ धावा फटकावल्या आहेत, पण सामन्याच्या अखेरच्या दिवशी बंगालला गुंडाळण्याचाकरण्याचा विश्वास मुंबईच्या खेळाडूंना आहे.
तिसऱ्या दिवसाची सावध सुरुवात मुंबईच्या सलामीवीरांनी केली खरी, पण भरवशाच्या वसिम जाफरचा (१९) मोहम्मद शामीच्या उजव्या यष्टीवरील चेंडूचा अंदाज चुकला. त्याने सोडलेला चेंडू ‘इन स्विंग’ झाला आणि त्यावर त्रिफळाचीत होऊन हताश वसिम तंबूत परतला. त्यानंतर फिरकीपटू झुनझुनवालाचा चेंडू तटवण्याच्या नादात कौस्तुभ पवार (३१) सोपा झेल देऊन बाद झाला. पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला (१४) झुनझुनवालाच्या गोलंदाजीवर ‘स्लीप’मध्ये जीवदान मिळाले, पण या जीवदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही. उपाहारापूर्वीच्या चेंडूवर लक्ष्मी रतन शुक्लाने त्याला अप्रतिम त्रिफळाचीत केले.
उपाहाराच्या वेळी मुंबईची ३ बाद ११३ अशी अवस्था होती, पण त्यानंतर हिकेन शाह आणि अभिषेक नायर या दोघांनी मुंबईच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचत बंगालला विकेट मिळवण्यापासून दूर ठेवले आणि सामना मुंबईच्या बाजूने वळवला. हिकेनने या वेळी झुनझुनवालाला ‘रिव्हर्स स्विप’ मारत चौकार वसूल केला आणि मोसमातील सलग तिसरे शतक झळकावले. दुसऱ्या बाजूने अभिषेकही त्याला अर्धशतक झळकावून चांगली साथ देत होता. शतक झाल्यानंतर शामीला मोठा फटका मारण्याच्या नादात हिकेन ‘लाँग ऑन’ला झेल देऊन तंबूत परतला. हिकेनने २०९ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ११८ धावांची अमूल्य खेळी साकारली. हिकेन बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या आदित्य तरेने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. बाद होण्यापूर्वी तरेने ११ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९ धावा केल्या. आदित्य बाद झाल्यावर मुंबईच्या संघाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. या वेळी अभिषेक नायरने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी साकारताना सामन्यातील दुसरे अर्धशतक लगावले.
विजयासाठी ३९१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बंगालच्या सलामीवीरांनी दिवस सावधपणे खेळून काढण्याचे काम चोख बजावले. या वेळी मुंबईच्या गोलंदाजांकडून एखाद-दुसऱ्या विकेटची अपेक्षा होती, पण त्यांना ती पूर्ण करता आली नाही.
संक्षिप्त धावफलक :  मुंबई (पहिला डाव) : २९७, बंगाल (पहिला डाव) : २०१ मुंबई (दुसरा डाव) : ७४.४ षटकांत ५ बाद २९४ (डाव घोषित) (हिकेन शाह ११८, अभिषेक नायर नाबाद ७३; मोहम्मद शामी २/३९)
बंगाल (दुसरा डाव) १६ षटकांत बिनबाद ४७ (रोहन बॅनर्जी खेळत आहे २३, अरिंदम दास खेळत आहे १९)   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा