रणजी स्पर्धेमध्ये ३९ वेळा अजिंक्यपद पटकावलेल्या मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात एकही निर्णायक विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे जर मुंबईला बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना शनिवारपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात निर्णायक विजय मिळवावा लागेल.
गुणतालिकेत मध्य प्रदेशचा संघ सहा सामन्यांमध्ये २० गुणांनिशी दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई संघ सहा लढतीत १४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर हा सामना जिंकत मुंबईने सहा गुणांची कमाई केली तर त्यांचेही २० गुण होऊ शकतात. मुंबईच्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली असली तरी त्यांना एकही निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. बंगाल आणि सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात मुंबईला विजयाची संधी चालून आली होती. पण गोलंदाजांच्या बोथट माऱ्यामुळे मुंबईला दोन्ही सामन्यांत विजयापासून वंचित रहावे लागले.
झहीर खानच्या परतण्याने मुंबईची गोलंदाजीला धार येऊ शकते. झहीरला यावेळी कर्णधार अजित आगरकर आणि धवल कुलकर्णी साथ देऊ शकतील, तर फिरकीची जबाबदारी अंकित चव्हाण आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्यावर असेल.
फलंदाजीमध्ये यष्टीरक्षक आदित्य तरेने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात द्विशतक झळकावले होते, त्यामुळे त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. वसिम जाफरसारखा अनुभवी सलामीवीर संघात असल्याने कौस्तुभ पवारला संधी मिळण्याची शक्यता नाही. रोहित शर्मा आणि हिकेन शाह चांगल्या फॉर्मात आहेत, तर अभिषेक नायरनेही अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. फलंदाजी चांगली होत असली तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मुंबई संघ मागे पडत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मुंबईला बोथट गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात सुधारणा केल्यास मुंबईकडून निर्णायक विजयाची अपेक्षा करता येईल.