ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत पुरुष गटात मुंबई आणि सांगली तर महिलांच्या गटात उस्मानाबाद व ठाणे या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष गटातील अत्यंत उत्कंठावर्धक उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने तुल्यबळ यजमान ठाणे संघाचा कडवा प्रतिकार ११-१० (६-५, ५-५) असा केवळ एका गुणाने मोडीत काढत अंतिम फेरी गाठली. मध्यंतराला मुंबईकडे केवळ १ गुणाची आघाडी होती. संपूर्ण सामना अत्यंत दोलायमान अवस्थेत असताना व प्रतिस्पर्धी संघास जिंकण्यासाठी केवळ ७ गुणांची गरज असताना मुंबईच्या विराज कोठमकरने संरक्षणाच्या शेवटच्या डावात १.३० मि. नाबाद खेळी करून विजयश्री खेचून आणली. मुंबईचे साकेत जेस्ते (१.३० मि., १.१० मि. व १ गडी), प्रणय मयेकर (१.४० मि. व १.३० मि.), प्रयाग कनगुटकर (२.४० मि. व १.४० मि.), मनोज वैद्य (१.२० मि. व २ गडी) व राहुल उईके (४ गडी ) हे विजयाचे प्रमुख शिलेदार होते. ठाण्याच्या सचिन पालकर (२.२० मि. व १.४० मि.), मनोज पवार (१.१० मि., २.१० मि. व २ गडी) व अमित पवार (१.५० मि., १.१० मि. नाबाद व २ गडी) यांनी कडवी झुंज दिली.
पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेत्या सांगलीने मुंबई उपनगरचा २२-१४ (११-८, ११-६) असा ८ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतरालाच सांगली संघ ३ गुणांनी आघाडीवर होता. विजयी संघाच्या तानाजी सावंत (१.५० मि., २.२० मि. नाबाद व २ गडी), नरेश सावंत (१.०० मि., १.५० मि. व २ गडी), युवराज जाधव (४ गडी) व मििलद चावरेकर (६ गडी) यांनी सुरेख खेळ केला. उपनगरकडून नचिकेत जाधव व किरण कांबळेने आक्रमणात प्रत्येकी ३ गडी बाद केले तर हर्षद हातणकरने १.१० मि. व १.३० मि. मिनिटे संरक्षण केले.
महिला गटात गतविजेत्या सातारा तसेच उपविजेत्या मुंबई उपनगरचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. उस्मानाबादने सातारा संघाचा ११-८ (६-३, ५-५) असा ३ गुणांनी सहज पराभव केला. साताऱ्याची राष्ट्रीय खेळाडू प्रियांका येळेला संपूर्ण सामन्यात सूर सापडलाच नाही. उस्मानाबादच्या सारिका काळे (३.२० मि., ३.३० मि. व २ गडी), सुप्रिया गाढवे (३.४० मि., १.२० मि. व २ गडी) व निकिता पवार (१.५० मि., १.२० मि. व ३ गडी) यांनी दमदार खेळ करून आपल्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यावर विजय मिळविताना महत्त्वाचे योगदान दिले. साताऱ्याच्या प्रीती डांगे (२.०० मि., २.०० मि. व १ गडी) व प्राजक्ता कुचेकर (२.१० मि. व ३ गडी) चमकल्या.
महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरवर (६-५, ३-३) ९-८ असा १ गुण व ३.३० मि. राखून विजय संपादन केला. पूजा भोपीने २.५० मि., १.५० मि. व प्रियांका भोपीने १.५० मि. व ४.१० मि. दर्जेदार संरक्षण केले तर कविता घाणेकर व मीनल भोईरने प्रत्येकी ३ गडी बाद केले. उपनगरच्या श्रुती सकपाळ (३.३० मि., १.४० मि. व १ गडी) व मयूरी पेडणेकर (१.५० मि.,१.३० मि. व ३ गडी) यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा