पहिल्या दिवशी दोन शतके फटकावणाऱ्या राजस्थानला दुसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांनी खीळ बसवत ५०० धावांचा टप्पा गाठण्यापासून परावृत्त केले. मुंबईच्या युवा गोलंदाजांनी शनिवारी अचूक गोलंदाजी केल्यामुळे राजस्थानला ४७८ धावांवरच समाधान मानावे लागले. राजस्थानच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कौस्तुभ पवार आणि आदित्य तरे यांनी चोख उत्तर देत दिवसअखेर संघाला बिनबाद ७६ अशी मजल मारून दिली.
शुक्रवारी शतक झळकावणाऱ्या विनीत सक्सेनाला (११४) आज शनिवारी एकही धाव काढता आली नाही. धवल कुलकर्णीने आपल्या दुसऱ्याच षटकात त्याचा काटा दूर करत संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर ठराविक फरकाने राजस्थानचे फलंदाज विशी-तिशीत बाद होत राहिले. दीक्षांत याज्ञिकने मात्र १३ चौकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची खेळी साकारत संघाला ४७८ धावांचा पल्ला गाठून दिला. धवल कुलकर्णीने तीन बळी मिळवत राजस्थानचे कंबरडे मोडले, तर सूर्यकुमार यादव आणि कौस्तुभ पवार यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत धवलला चांगली साथ दिली.
राजस्थानला ५०० धावांच्या आत तंबूत धाडून गोलंदाजांनी आपले काम केले होते, आता मदार होती ती फलंदाजांवर आणि मुंबईच्या फलंदाजांनी विकेट न गमावता संघाला चांगली सुरुवात करून दिली. कौस्तुभ पवारने संयमी फलंदाजी करत राजस्थानचा तोफखाना निष्प्रभ करण्याचे काम चोख बजावले, तर आदित्य तरेने धावफलक हलता ठेवण्याची कामगिरी योग्य प्रकारे साध्य केली. कौस्तुभने ९५ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद २६ धावांची खेळी साकारली, तर आदित्यने ७४ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव) : १५२ षटकांत सर्व बाद ४७८
(ऋषिकेश कानिटकर ११९, विनीत सक्सेना ११४; धवल कुलकर्णी ३/८८, सूर्यकुमार यादव २/२१, कास्तुभ पवार २/२१).
मुंबई (पहिला डाव) : २८ षटकांत बिनबाद ७६
(कौस्तुभ पवार खेळत आहे २६, आदित्य तरे खेळत आहे ४३).

Story img Loader