‘‘आंध्र प्रदेशविरुद्धच्या साखळी सामन्यात आम्ही पहिल्या डावात पिछाडीवर पडलो आणि त्या वेळीच जेतेपदाचा निर्धार केला,’’ हे मुंबईचा कर्णधार आदित्य तरेचे ४१व्या विजेतेपदानंतरचे बोल ऐकून खडूस मुंबईकर नक्कीच आनंदित झाला असेल. कारण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतला खडूसपणा लुप्त झाल्याचे म्हटले जात होते. पण तो या वर्षी काही प्रमाणात नक्कीच जाणवला आणि हेच या विजयाचे रहस्य असावे. काही वर्षांपूर्वी अंतर्गत गट-तट, राजकारण, अहंभाव या साऱ्या गोष्टींनी संघावर निराशेचे आणि निरुत्साहाचे ढग दाटले होते. पण या विजयामुळे ते सारे मळभ निघून गेले आहे. फक्त संघ जिंकला म्हणून असे म्हणणे चुकीचे ठरेलही; पण विजयाची ईर्षां त्यांनी दाखवली आणि त्यानुसार खेळ केला, हे महत्त्वाचे ठरते. कारण हा विजय एकटय़ा-दुकटय़ाने मिळवून दिलेला नाही. या विजेतेपदाला अनेकांचे हात लागले आहेत आणि एकत्र हातांनीच एल्गार होतो, तोच मुंबईकरांकडून पाहायला मिळाला. हा विजय खरेच सांघिक होता. श्रेयस अय्यरने या मोसमात चुणूक दाखवली खरी, पण सिद्धेश लाडसारख्या संकटमोचकाला विसरूनही चालणार नाही. कर्णधार आदित्य तरेचे यष्टिरक्षण व उपयुक्त खेळ्या तर शार्दूल ठाकूर, विशाल दाभोळकर, बलविंदर संधू, धवल कुलकर्णी यांची गोलंदाजी तेवढीच महत्त्वाची ठरते. त्यामुळे हे विजेतेपद एकीचे बळ दाखवणारे ठरते.
गेल्या वर्षी मुंबईला पहिल्याच सामन्यात जम्मू आणि काश्मीरसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. या वर्षीच्या पहिल्या सामन्यातही मुंबईला आंध्र प्रदेशकडून पहिल्या डावातील पिछाडीमुळे चांगली सुरुवात करता आली नव्हती. पण त्यानंतर तरेने संघभावना जागवली. या वर्षी मुंबईने कर्णधार बदलला नाही आणि ढीगभर खेळाडूंना खेळवले नाही, ही चांगली गोष्ट घडली. नाहीतर काही वर्षांपूर्वी या सामन्यात मुंबईचा कर्णधार कोण असेल आणि कोण खेळेल, यावर पैजा लावायची वेळ आली होती. या वर्षी मूळात संघातील धुसफुस कमी झाली.
आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. ४ बाद ६१ अशी अवस्था असताना सिद्धेशच्या ८६ धावांच्या खेळीने मुंबईला तारले होते. त्याला आघाडी मिळवून देता आली नसली तरी त्याची खेळी संघाला सावरणारी नक्कीच होती. पंजाबविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात श्रेयसचे द्विशतक आणि अखिल हेरवाडकरचे सहा बळी यांच्या जोरावर मुंबईने पहिला विजय नोंदवला. त्यानंतर मात्र मुंबईला एकदाही पिछाडीचे तोंड पाहावे लागले नाही. आघाडी किंवा विजय हेच मुंबईच्या पदरात पडत गेले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील तामिळनाडूविरुद्धचा सामना हा अविस्मरणीय असाच आहे. तामिळनाडूच्या ४३४ धावांचा पाठलाग करताना मुंबईची ५ बाद ५२ अशी अवस्था होती. त्या वेळी सिद्धेशने साकारलेली १५० धावांची खेळी अद्भुत अशीच होती. त्याच्या खेळीने संघात विजयाची प्रेरणा दिली आणि दुसऱ्या डावात तामिळनाडूला मुंबईने ९५ धावांत गुंडाळले. हा सामना मुंबई सहज जिंकेल, असे वाटत असताना तळाच्या फलंदाजापर्यंत पोहोचला आणि मुंबईने थरारक विजयाची नोंद केली.
चौथ्या सामन्यात श्रेयसची १७३ धावांची खेळी आणि धवलचे पाच बळी हे महत्त्वाचे ठरले. बडोद्याविरुद्धच्या या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेतली. त्यानंतरच्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही श्रेयसने शतक झळकावले. रोहित शर्माचे शतक आणि सिद्धेशच्या उपयुक्त खेळीमुळे मुंबईने उत्तर प्रदेशवर फॉलोऑन लादण्याची हिंमत दाखवली. पण त्यांना पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर समाधान मानावे लागले. त्यानंतर रेल्वेविरुद्धचा सामना मुंबईने जिंकला. या सामन्यात अखिल हेरवाडकरची १४५ धावांची खेळी लक्षात राहणारी ठरली. त्यानंतर मध्य प्रदेशचे आव्हान मुंबईने पूर्ण करत विजय मिळवला. गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखिलने पुन्हा एकदा १९२ धावांची मोठी खेळी साकारली. उपांत्यपूर्व फेरीतील त्याची शतकी खेळीही चांगली झाली. दुसऱ्या डावात श्रेयस चमकला. पण झारखंडला ९४ धावांमध्ये गुंम्डाळण्यात जय बिश्ता आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी मोलाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत तरे, श्रेयस, सिद्धेश आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली, तर संधूचे पाच बळीही महत्त्वाचे ठरले. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने मध्यप्रदेशला मागे टाकत अंतिम फेरी गाठली आणि पुण्याच्या गवताळ खेळपट्टीवर मुंबईने तीन दिवसांतच जेतेपदाला गवसणी घातली. श्रेयसने पुन्हा एकदा शतकाचा नजराणा पेश केला. पण सिद्धेशने अकरावा फलंदाज संधूला साथीने घेत साकारलेली १०३ धावांची भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. धवल कुलकर्णी आणि शार्दूल ठाकूर या जोडीची गोलंदाजी कौतुकास्पद अशीच होती. या हंगामात श्रेयसची बॅट चांगलीच तळपली. या वर्षांतील त्याच्या धडाकेबाज खेळी नजरेचे पारणे फेडणाऱ्याच होत्या. सिद्धेशने वेळप्रसंगी संघाला तारण्याची भूमिका चोख बजावली. तरे एक कर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज म्हणूनही यशस्वी ठरला. अखिलसारखा गुणवान खेळाडू संघाला मिळाला आहे. शार्दूलनेही गोलंदाजीत सातत्य राखले. धवलकडून अखेरच्या काही सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. संधूनेही संधीचे सोने केले. पण काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याती गरज नक्कीच आहे. विशाल दाभोळकरने बळी मिळवले असले तरी त्याची गोलंदाजीची शैली लयबद्ध वाटली नाही. त्याची शैली तांत्रिक वाटत असून याचा विचार व्हायला हवा. सूर्यकुमार यादवने अजूनही परिपक्व होण्याची गरज आहे. इक्बालला सांघिकतेचे अतिरिक्त डोस पाजण्याची गरज वाटते. अभिषेक नायरला विश्वास आणि दिलासा देण्याची आवश्यकता आहे. हे सारे केले तर मुंबईचा संघ पुन्हा एकदा गतवैभव मिळवू शकेल. मुंबईने या वेळी काय कमावले, तर त्याचे उत्तर फारसे कठीण नाहीच. मुंबईने या वेळी विजेतेपदासह खडूसपणा पुन्हा कमावला.
prasad.lad@expressindia.com