यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. इंदूर येथे मध्य प्रदेशविरुद्ध सुरू झालेल्या सामन्यातही मुंबईला आश्वासक कामगिरी करता आली नाही आणि त्यांनी पहिल्या दिवसअखेर ५ विकेट्सच्या मोबदल्यात कूर्मगतीने २३५ धावा केल्या.
मध्य प्रदेशचा कर्णधार देवेंद्र बुंदेलाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत हा निर्णय योग्य ठरवला. अनुभवी वासिम जाफर आणि कौस्तुभ पवार यांनी डावाची सुरुवात केली. मात्र जाफर १८ धावा करून ईश्वर पांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला.
यंदाच्या मोसमात चांगले प्रदर्शन करणारा हिकेन शाहलाही पांडेने झटपट बाद करत मुंबईला आणखी एक धक्का दिला. मात्र यानंतर कौस्तुभ पवार आणि आदित्य तरे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मुंबईला सुस्थितीत नेणार असे वाटत असतानाच आनंद राजनने तरेला बाद केले. तरेने ४२ धावा केल्या. यानंतर अभिषेक नायरने कौस्तुभला साथ दिली. मात्र २८ धावांवर ईश्वर पांडेने त्याला बाद करत मुंबईला अडचणीत टाकले.
ईश्वर पांडेने युवा सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर कौस्तुभ आणि अंकित चव्हाण यांनी नाबाद ८० धावांची भागीदारी करत मुंबईला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. कौस्तुभने दिवसभर चिकाटीने खेळ करत २७० चेंडूत १४ चौकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली. अंकित ३६ धावांवर खेळत आहे. मध्य प्रदेशतर्फे ईश्वर पांडेने सर्वाधिक ४ बळी घेतले. मुंबईला जबरदस्त फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची उणीव जाणवली. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हे दोघेही भारतीय संघासाठी खेळत आहेत.