इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात दणकेबाज फलंदाजी करणाऱ्या हिकेन शाहने धडाकेबाज नाबाद शतकी खेळी साकारली, तर कौस्तुभ पवार (५३), आदित्य तरे (८०) आणि रोहित शर्मा (७९) यांनी दिमाखदार अर्धशतके झळकावली. त्या बळावर राजस्थानच्या ४७८ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ गटातील सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३६० अशी दमदार मजल मारली आहे.
शनिवारच्या बिनबाद ७६ धावसंख्येवरून मुंबईने आपल्या खेळाला पुढे प्रारंभ केला. आणि कौस्तुभ पवार यांनी १२३ धावांची सलामी दिली. अंकित चौधरीने पवारला बाद करून ही जोडी फोडली, तर पंकज सिंगने १४ चौकारांसह १७१ चेंडूंत आपली खेळी साकारणाऱ्या तरेला तंबूची वाट दाखवली. त्यानंतर हिकेन शाह आणि रोहित शर्मा यांनी मुंबईची धावसंख्या वाढविण्याची जबाबदारी स्वीकारली. चहापानाला मुंबईची स्थिती २ बाद ३१७ अशी समाधानकारक होती. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी रचली. धोकादायक ठरू पाहणारी ही जोडी अखेर रितुराज सिंगने फोडली. १४१ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांनिशी ७९ धावा काढणाऱ्या रोहितचा त्याने त्रिफळा उडवला. २४५ चेंडूंत १५ चौकारांसह ११८ धावांची खेळी उभारणारा हिकेन अजून मैदानावर आहे, ही मुंबईसाठी सुखद गोष्ट आहे, तर नाइट वॉचमन क्षेमल वायंगणकर ७ धावांवर खेळत आहे.
वेगवान त्रिकूट पंकज, रितुराज आणि अंकित यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळवला. सोमवारी या सामन्याचा अखेरचा दिवस आहे. सामना निर्णायक ठरण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुण वसूल करण्यासाठी मुंबईला ११८ धावांची आवश्यकता आहे, तर त्यांचे सात फलंदाज अद्याप शिल्लक आहेत.
  संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव) : ४७८
मुंबई (पहिला डाव) : ११८ षटकांत ३ बाद ३६० (कौस्तुभ पवार ५३, आदित्य तरे ८०, हिकेन शाह खेळत आहे ११८, रोहित शर्मा ७९).

Story img Loader