ठाण्याच्या तेजस कांबळेने मुंबई उपनगरच्या शौर्य पेडणेकरचा ४-३ असा अटीतटीच्या लढतीत पराभव करून येथील नाशिक जिमखान्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत उपकनिष्ठ गटाचे अजिंक्यपद मिळविले. मुलींमध्ये मुंबई उपनगरची पायल बोहरा, कॅडेट गटात मुंबईचा चिन्मय सोमय्या, रायगडची स्वस्तिका घोष यांनी विजेतेपद प्राप्त केले.
तेजस विरुद्ध शौर्य यांच्यातील सामना या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक रोमहर्षक ठरला. शौर्यने प्रारंभी २-० अशी आघाडी घेतली असतानाही तेजसने पुढील दोन गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. शौर्यने पुन्हा पुढील गेम जिंकत आघाडी घेतल्यानंतर तेजसने परत त्याची बरोबरी साधली. सातवा निर्णायक गेमही ११-४ असा जिंकत तेजसने सामना खिशात टाकला. मुलींच्या एकेरीत पायल बोहराने मानसी छाजेडला २२-२०, ११-९, ११-४, ११-८ असे सरळ चार गेममध्ये नमविले.