मुंबई शहर, ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, मुं. उपनगर, रायगड, कोल्हापूर, सातारा या मुलींच्या संघांनी ४१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर मुंबई शहर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, उपनगर, परभणी या मुलांच्या संघाचीदेखील बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरू आहे.
कुळगाव-बदलापूर येथील आदर्श विद्यालय येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत मुलींच्या ‘अ’ गटात गतविजेत्या मुंबईने सांगलीला २३-१६ असे नमवत बाद फेरी गाठली. मध्यंतराला ८-७ अशी नाममात्र आघाडी मुंबईकडे होती. नंतर सोनाली शिंगटे व तेजस्विनी पोटे यांनी जोरदार खेळ करीत मुंबईला विजयी केले. तसेच ठाण्यानेदेखील सांगलीला १५-१२ असे चकविले. दीपाली भोगले, सायली परुळकर या विजयात चमकल्या. ‘ड’ गटात उपनगरने रायगडचा ४२-१३ असा पाडाव केला. सायली जाधव, पूजा जाधव यांच्या झंझावातासमोर रायगडची मात्रा चालली नाही. रायगडची अनिता भोईर एकाकी लढली.
मुलांच्या ‘क’ गटात मुंबई शहरने यजमान ठाण्याला २८.१५ असे चीत केले. अक्षय उगाडे, दुर्वेश पाटील या विजयात चमकले. मध्यंतराला मुंबई ६-७ अशी पिछाडीवर होती. ठाण्याचे प्रथमेश शिंदे, अक्षय भोईर छान खेळले. ‘इ’ गटात मुं. उपनगरने रायगडला ६-४ असे पराभूत केले. संपूर्ण डाव संथगतीने खेळलेल्या या सामन्यांत मध्यंतराला ३-२ अशी रायगडकडे आघाडी होती. रुपेश खानविलकर, प्रतीक वडवलकर उपनगरकडून तर नितेश पाटील, सुरज साळकर रायगडकडून छान खेळले.