रणजी क्रिकेटच्या इतिहासातील विदर्भाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यावर मुंबईने निर्विवाद वर्चस्व राखताना तब्बल ३३८ धावांनी आरामात विजय मिळवला. रविवारी सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी फक्त २२ मिनिटांत आणि ५.४ षटकांत विदर्भाचा ‘खेळ खल्लास’ झाला. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने दोन्ही उर्वरित फलंदाजांना तंबूची वाट दाखवत विदर्भाच्या दुसऱ्या डावाला फक्त १९१ धावसंख्येवर पूर्णविराम दिला. पहिल्या डावात ४० धावांत ३ बळी घेणाऱ्या ठाकूरने दुसऱ्या डावातही ४८ धावांत ४ बळी घेतले आणि मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
हरयाणा, पंजाबविरुद्ध निर्णायक विजयानिशी चालू हंगामाचा दिमाखात प्रारंभ करणाऱ्या चाळीस वेळा रणजी विजेत्या मुंबईला दिल्लीविरुद्धच्या अनिर्णीत सामन्यात फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले होते. परंतु वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर विदर्भासारख्या दुबळ्या संघावर सहजगत्या निर्णायक विजय मिळवून मुंबईने आणखी सहा गुणांची भर घालत आपली गुणसंख्या १९ पर्यंत नेली आहे. आता ‘अ’ गटामध्ये मुंबईचा संघ अव्वल स्थानावर आहे.
विदर्भाचा पराभव अटळ आहे, हे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरच स्पष्ट झाले होते. चौथ्या दिवशीच्या सहाव्या षटकातील ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर अक्षय वाखरे (७) बाद झाला. अचानक उसळी घेतलेला हा चेंडू वाखरेला खेळणे कठीण गेले आणि यष्टिरक्षक आदित्य तरेकडे झेल देऊन तो माघारी परतला. त्यानंतर आलेल्या संदीप सिंगला भोपळाही फोडता आला नाही. ठाकूरने चौथ्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त करीत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेपर्यंत लढणाऱ्या श्रीकांत वाघने ७१ मिनिटे आणि ५२ चेंडूंचा सामना करीत ८ चौकारांसह ४१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : २६१
विदर्भ (पहिला डाव) : ११३
मुंबई (दुसरा डाव) : ४ बाद ३८१ डाव घोषित.
विदर्भ (दुसरा डाव) :  ४६.४ षटकांत सर्व बाद १९१ (शलभ श्रीवास्तव ६९, हेमांग बदानी १९, श्रीकांत वाघ नाबाद ४१; शार्दूल ठाकूर ४/४८, विशाल दाभोळकर २/३३).

सकारात्मक विचारसरणी आणि झहीर खानच्या नेतृत्वाला विजयाचे श्रेय -कुलकर्णी
मुंबई : ‘‘नेतृत्वामुळे निर्णयात खूप फरक पडतो. मुंबईची सकारात्मक विचारसरणी आणि झहीर खानचे नेतृत्व यामुळेच संघाची विजयी घोडदौड सुरू आहे,’’ असे मत मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मुंबईने आतापर्यंत चार सामन्यांपैकी तीन सामन्यांत निर्णायक विजय मिळवत आपल्या शानदार कामगिरीची चुणूक दाखवली आहे. याविषयी कुलकर्णी म्हणाले, ‘‘मी खेळाडू असताना, मग कर्णधार झाल्यावर आणि आता प्रशिक्षकपदावर कार्यरत असताना नेहमी निर्णायक विजयाचा दृष्टिकोन बाळगतो. मुंबई संघाने आधीपासूनच या निर्णायक विजयाचेच उद्दिष्ट जोपासले होते. कर्णधार झहीर खानलाही निर्णायक विजयाचीच उत्सुकता होती. त्याने मुंबईच्या गोलंदाजांना यथायोग्य मार्गदर्शन करीत हा विजयाचा अध्याय लिहिला. त्याने गोलंदाजांचा अतिशय खुबीने वापर केला.’’
वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी दुखापतग्रस्त आहे, तर झहीर खान, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत आगामी सामन्यावर कितपत परिणाम होईल, याबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘या दिग्गज खेळाडूंची उणीव मुंबईला नक्कीच जाणवेल, परंतु झहीरने या हंगामातील चार सामन्यांत नेतृत्व करताना गोलंदाजांना जे कानमंत्र दिले, त्याच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. या चार सामन्यांत झहीर असतानाच गोलंदाजांची एक फळी तयार करायची अशी आम्ही योजना आखली होती. यातून काही नवे गोलंदाज आपल्याला मिळतील. या सामन्यात शार्दूल ठाकूर आणि अकबर खान चांगले खेळले, तर जावेद खानला आम्ही विश्रांती दिली होती. त्यामुळे झहीरच्या अनुपस्थितीतही आम्ही आगामी सामन्यांसाठी सज्ज आहोत. शार्दूल ठाकूर आणि अकबर खान चांगले खेळले, तर जावेद खानला आम्ही विश्रांती दिली होती. त्यामुळे झहीरच्या अनुपस्थितीतही आम्ही आगामी सामन्यांसाठी सज्ज आहोत.’’

Story img Loader