रणजी क्रिकेटच्या इतिहासातील विदर्भाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यावर मुंबईने निर्विवाद वर्चस्व राखताना तब्बल ३३८ धावांनी आरामात विजय मिळवला. रविवारी सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी फक्त २२ मिनिटांत आणि ५.४ षटकांत विदर्भाचा ‘खेळ खल्लास’ झाला. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने दोन्ही उर्वरित फलंदाजांना तंबूची वाट दाखवत विदर्भाच्या दुसऱ्या डावाला फक्त १९१ धावसंख्येवर पूर्णविराम दिला. पहिल्या डावात ४० धावांत ३ बळी घेणाऱ्या ठाकूरने दुसऱ्या डावातही ४८ धावांत ४ बळी घेतले आणि मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
हरयाणा, पंजाबविरुद्ध निर्णायक विजयानिशी चालू हंगामाचा दिमाखात प्रारंभ करणाऱ्या चाळीस वेळा रणजी विजेत्या मुंबईला दिल्लीविरुद्धच्या अनिर्णीत सामन्यात फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले होते. परंतु वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर विदर्भासारख्या दुबळ्या संघावर सहजगत्या निर्णायक विजय मिळवून मुंबईने आणखी सहा गुणांची भर घालत आपली गुणसंख्या १९ पर्यंत नेली आहे. आता ‘अ’ गटामध्ये मुंबईचा संघ अव्वल स्थानावर आहे.
विदर्भाचा पराभव अटळ आहे, हे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरच स्पष्ट झाले होते. चौथ्या दिवशीच्या सहाव्या षटकातील ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर अक्षय वाखरे (७) बाद झाला. अचानक उसळी घेतलेला हा चेंडू वाखरेला खेळणे कठीण गेले आणि यष्टिरक्षक आदित्य तरेकडे झेल देऊन तो माघारी परतला. त्यानंतर आलेल्या संदीप सिंगला भोपळाही फोडता आला नाही. ठाकूरने चौथ्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त करीत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेपर्यंत लढणाऱ्या श्रीकांत वाघने ७१ मिनिटे आणि ५२ चेंडूंचा सामना करीत ८ चौकारांसह ४१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : २६१
विदर्भ (पहिला डाव) : ११३
मुंबई (दुसरा डाव) : ४ बाद ३८१ डाव घोषित.
विदर्भ (दुसरा डाव) : ४६.४ षटकांत सर्व बाद १९१ (शलभ श्रीवास्तव ६९, हेमांग बदानी १९, श्रीकांत वाघ नाबाद ४१; शार्दूल ठाकूर ४/४८, विशाल दाभोळकर २/३३).
विदर्भ नतमस्तक!
रणजी क्रिकेटच्या इतिहासातील विदर्भाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यावर मुंबईने निर्विवाद वर्चस्व राखताना तब्बल ३३८ धावांनी आरामात विजय मिळवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-12-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai thrash vidarbha by 338 runs top group a