उन्मुक्त चंदच्या शतकाच्या जोरावर दिल्लीने मुंबईविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. बीकेसी संकुलातील मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात २ बाद १९८ वरून पुढे खेळणाऱ्या मुंबईने ६ बाद ३४७ धावांवर आपला डाव घोषित केला. शतकवीर आदित्य तरे कालच्या धावसंख्येत केवळ सात धावांची भर घालून १२२ धावांवर बाद झाला. शतकाकडे कूच करणारा सिद्धेश लाड ८५ धावांवर बाद झाला. अनुभवी अभिषेक नायरने ९ चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची वेगवान खेळी केली. दिल्लीतर्फे पवन सुन्यालने सर्वाधिक ३ बळी घेतले. मुंबईने दिल्लीसमोर ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले. मर्यादित वेळ पाहता दिल्लीला हे लक्ष्य गाठणे कठीण होते परंतु दुसरीकडे मुंबईला फिरकीच्या जोरावर दिल्लीला गारद करण्याची संधी होती. मात्र युवा उन्मुक्त चंदने मुंबईच्या अपेक्षांवर पाणी फेरले. उन्मुक्तने अनुभवी गौतम गंभीरच्या साथीने १४६ धावांची सलामी दिली. ५१ धावांवर गंभीरने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात पुनरागमनाची शक्यता धुसर झालेल्या वीरेंद्र सेहवागने ५ चौकार आणि एका षटकारासह २२ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी केली. उन्मुक्तने १४ चौकार आणि एका षटकारासह १०६ धावांची दिमाखदार खेळी साकारली. ४८ षटकांमध्ये मुंबईचा कर्णधार झहीर खानने सहा गोलंदाजांचा प्रयोग केला मात्र एकालाही यश मिळू शकले नाही. हा सामना अनिर्णित झाल्याने हरयाणा आणि पंजाबवर मिळवणाऱ्या मुंबईचा विजयवारू रोखला गेला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. मुंबईची पुढची लढत विदर्भशी होणार आहे.

Story img Loader