कोणत्याही सामन्याच्या अडीच दिवसांनंतर खेळपट्टीचा नूर बदलतो असे म्हणतात. पण अडीच दिवसांनंतर सामन्यावर वरचष्मा असलेल्या मुंबईचे नशीब बदलणार काय, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. ओडिशावर फॉलोऑन लादत मुंबईने तिसऱ्या दिवशी सकारात्मक निर्णय घेतला खरा, परंतु दुसऱ्या डावातील निष्प्रभ आणि बोथट माऱ्यामुळे मुंबईला लौकिकाला साजेसे यश मिळवता आले नाही. तिसऱ्या दिवसअखेर ओडिशाची दुसऱ्या डावात २ बाद ११५ अशी स्थिती असून ते १३० धावांनी पिछाडीवर आहेत, तर मुंबईला एका डावाने सामना जिंकण्यासाठी ८ बळींची गरज आहे.
तिसऱ्या दिवसाच्या पाचव्याच षटकात अभिलाष मलिकला (३३) बाद करीत क्षेमल वायंगणकरने मुंबईला पहिले यश मिळवून दिले असले तरी नटराज बेहरा एका बाजूने खिंड लढवत होता. पण उपाहारानंतरच्या चौथ्याच षटकात जावेदने त्याचा अडसर दूर केला. नटराजने २४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १३० धावांची खेळी साकारली. तो बाद झाल्यावर २९ धावांमध्ये ओडिशाचा पहिला डाव २५६ धावांवर आटोपला.
२४५ धावांच्या पिछाडीवरून दुसरा डाव सुरू करताना ओडिशाच्या सलामीवीरांनी मुंबईच्या गोलंदाजांचे घामटे काढले. प्रवीण तांबेच्या पहिल्याच षटकात गोविंद पोदारचा झेल यष्टीरक्षक आदित्य तरेने सोडला, तेव्हा तो १४ धावांवर होता. पण पोदारला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. चहापानापर्यंत मुंबईला एकही बळी मिळवता आला नाही. चहापानानंतरच्या सातव्या षटकात त्याच तांबेच्या गोलंदाजीवर तरेनेच पोदारला (४२) झेलबाद केले. त्यानंतर पुन्हा तांबेनेच गिरिजा रौतला (४३) बाद करीत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. पण त्यानंतर मुंबईला एकही बळी मिळवता आला नाही आणि ओडिशाने तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ११५ अशी मजल मारली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९ बाद ५०१ (डाव घोषित)
ओडिशा (पहिला डाव) : ६३.५ षटकांत सर्व बाद २५६ (नटराज बेहरा १३०; जावेद खान ४/५३)
ओडिशा (दुसरा डाव) : ४७ षटकांत २ बाद ११५ (गिरिजा रौत ४३; प्रवीण तांबे २/५२).
ओडिशाला झटपट गुंडाळण्याचे ध्येय -तांबे
मुंबई : ‘‘सामना जिंकण्यासाठी आम्हाला आणखी आठ बळींची आवश्यकता असून, मंगळवारी त्यांना झटपट बाद करण्याचेच आमचे ध्येय असेल. खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत आहे. योग्य ठिकाणी चेंडू टाकल्यावर नक्कीच यश मिळेल,’’ असे लेग-स्पिनर प्रवीण तांबेने सांगितले. पदार्पणाविषयी प्रवीण म्हणाला की, ‘‘मुंबईकडून खेळायचे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे. मुंबई एक ‘अजिंक्य’ संघ आहे. ४२व्या वर्षी संधी मिळाली असली तरी मला त्याचे वाईट वाटत नाही. आता जिवापाड मेहनत करून संघासाठी चांगले योगदान देण्याचाच विचार माझ्या मनात आहे.’’
कितने दूर, कितने पास!
कोणत्याही सामन्याच्या अडीच दिवसांनंतर खेळपट्टीचा नूर बदलतो असे म्हणतात. पण अडीच दिवसांनंतर सामन्यावर वरचष्मा असलेल्या मुंबईचे नशीब बदलणार काय, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला.
First published on: 17-12-2013 at 03:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai v odisha ranji trophy