पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशसारख्या संघाबरोबर खेळताना पहिल्या डावात मुंबईला आघाडीही घेता आली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या रणजी सामन्यात त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून, घरच्याच वानखेडे मैदानावर त्यांच्यापुढे आव्हान असेल ते युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाचे. पहिल्या सामन्यात पंजाबने रेल्वेवर विजय मिळवत सात गुणांची कमाई केली होती. त्यामुळे हा सामना मुंबईसाठी नक्कीच सोपा नसून त्यांच्यासाठी ही मोठी परीक्षाच असेल.

पहिल्या सामन्यात मुंबईला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नव्हती. युवा सिद्धेश लाडने ८६ धावांची खेळी साकारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यश आले नाही.

कर्णधार आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर या अनुभवी फलंदाजांना अजूनही लय सापडलेली नाही. गोलंदाजीमध्ये बलविंदर सिंग संधू (कनिष्ठ), शार्दुल

ठाकूर, विशाल दाभोळकर यांच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी फॉर्मात दिसत नसला तरी हा सामना त्याच्यासाठीही चांगली संधी असणार आहे.

पंजाबने गेल्या सामन्या सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या सामन्यात २०१ धावांची खेळी साकारणारा गुरकीरट सिंग मानची भारतीय संघात निवड झाली असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. पण युवराज, मनन व्होरा, जीवनज्योत सिंग, मनदीप सिंग अशी तगडी फलंदाजी त्यांच्याकडे आहे. युवा गोलंदाज बरिंदर सिंग सरन चांगल्या फॉर्मात असून त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. त्याचबरोबर फिरकीपटू वरुण खन्नादेखील चांगल्या लयीत दिसत आहे. पंजाबने दिमाखात सुरुवात केली असून त्यांच्यापुढे विजयी घोडदौड कायम ठेवण्याचे आव्हान असेल. मुंबई पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळत असून त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. पहिल्या सामन्यात मुंबईला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी लयीत येण्यासाठी त्यांच्यासाठी हा सामना सर्वात महत्त्वाचा ठरेल.

विदर्भचा सामना दिल्लीशी

नवी दिल्ली : रणजी क्रिकेट स्पध्रेतील पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभी करूनही अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागलेल्या विदर्भ संघासमोर गुरुवारपासून दिल्लीचे आव्हान आहे. गौतम गंभीर, इशांत शर्मा, उन्मुक्त चंद या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीसमोर विदर्भचा चांगलाच कस लागणार आहे.

ओदिशाविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर आदित्य शानवरे याच्यासह जितेश शर्मा, गणेश सतीश, वासिम जाफर यांच्यावर विदर्भाच्या फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत उमेश यादव हा त्यांचा हुकमी एक्का आहे. त्याला श्रीकांत वाघ, रविकुमार ठाकूर, अक्षय वाखारे यांची साथ मिळाल्यास दिल्लीचा कस लागेल, हे निश्चित.

ओदिशाविरुद्ध महाराष्ट्राच्या संघात बदल

कटक : ओदिशाविरुद्ध गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या रणजी क्रिकेट सामन्यासाठी महाराष्ट्र संघात भरत सोळंकी या अष्टपैलू खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी हरयाणाविरुद्ध  खेळलेल्या डॉमिनिक मुथ्थुस्वामी याच्याऐवजी सोळंकी याला स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्र संघाचे नेतृत्व रोहित मोटवानी करीत असून हर्षद खडीवाले, स्वप्नील गुगळे, केदार जाधव, अंकित बावणे, चिराग खुराणा, राहुल त्रिपाठी यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत त्यांना  अक्षय दरेकर, श्रीकांत मुंडे, समाद फल्लाह, निकित धुमाळ, अनुपम संकलेचा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

 

 

Story img Loader