मुंबईकडे २०३ धावांची आघाडी; दुसऱ्या डावात गुजरात ५ बाद १५९ ; अभिषेक नायरचे झुंजार नाबाद अर्धशतक
नव्या वर्षांचे स्वागत दिमाखदार विजयानिशी जल्लोषात करण्याची योजना मुंबई संघाने आखली आहे. याचे कारणही तसेच आहे. सकाळच्या सत्रात २०३ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर मुंबईने गुजरातची दुसऱ्या डावात ५ बाद १५९ अशी केविलवाणी अवस्था केली आहे. त्यांचा भरवशाचा फलंदाज पार्थिव पटेल तंबूत परतलेला आहे. त्यामुळे आता गुजरातचा उर्वरित निम्मा संघ फारसा प्रतिकार करेल, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. त्यामुळे नव्या वर्षांच्या नव्या दिवशी मंगळवारी मुंबईचा संघ गुजरातवर निर्णायक विजय नोंदवून आपले उपांत्यपूर्व फेरीतील स्थान रुबाबात पक्के करेल.
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या साखळीमधील ‘अ’ गटाच्या पहिल्या सहा सामन्यांत मुंबईच्या खात्यावर जमा होते फक्त १४ गुण. पण आता मुंबई सलग दुसऱ्या निर्णायक विजयाच्या उंबरठय़ावर आहे. त्यामुळे मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. ‘‘मुंबईच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. त्यामुळे आम्ही मंगळवारी निर्णायक विजय साजरा करू शकू. या पाश्र्वभूमीवर बाद फेरीकडे वाटचाल करताना आमचे मनोधर्य उंचावले आहे,’’ असे कुलकर्णी यांनी
सांगितले.
सकाळच्या सत्रात अभिषेक नायरने नाबाद ७२ धावांची खेळी साकारून धवल कुलकर्णी आणि झहीर खानसोबत छोटेखानी भागीदाऱ्या केल्या. नायर आणि झहीर यांनी दहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच मुंबईला पहिल्या डावात ४४७ धावांचे आव्हान उभे करता आले. त्यानंतर वेगवान गोलंदाज जावेद खान आणि फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण यांनी गुजरातच्या फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला. गुजरातच्या पहिल्या डावात झुंजार शतकी खेळी साकारणाऱ्या पार्थिवचा अडसर जावेदने दूर केला, तर मनप्रित जुनेजा ३९ धावांवर खेळत
आहे.
गुजरातचा संघ अद्याप ४४ धावांनी पिछाडीवर असून, ते डावाने पराभव टाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
संक्षिप्त धावफलक
गुजरात (पहिला डाव) : २४४
मुंबई (पहिला डाव) : १३४.२ षटकांत सर्व बाद ४४७ (वसिम जाफर १७१, हिकेन शाह ८२, सूर्यकुमार यादव ४२, अभिषेक नायर नाबाद ७२, धवल कुलकर्णी २२ ; रुश कलारिया ३/८०, कुशांग पटेल ३/७९)गुजरात (दुसरा डाव) : ५४.३ षटकांत ५ बाद १५९ (पार्थिव पटेल ४७, मनप्रित जुनेजा नाबाद ३९; जावेद खान २/२२, अंकित चव्हाण २/५९)

झहीरविषयी चिंतेचे कारण नाही
मुंबई : भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी आसुसलेला मुंबईचा वेगवान गोलंदाज झहीर खान दुखापतींशीही झगडतानाच नेहमी आढळतो. सोमवारी गुजरातचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करीत असताना झहीर गोलंदाजीसाठी मैदानावर उतरला नाही. त्यामुळे झहीरच्या दुखापतीविषयी साशंका निर्माण झाली. सकाळच्या सत्रात अभिषेक नायरसोबत दहाव्या विकेटसाठी भागीदारी साकारताना झहीरला त्रास होत होता. प्राथमिक वैद्यकीय मदत घेतल्यानंतर त्याने आपली खेळी चालू ठेवली. पण झहीर गोलंदाजीसाठी का उतरू शकला नाही, याचे उत्तर मात्र दिवसअखेपर्यंत मिळू शकले नाही. पण सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी झहीरविषयी चिंतेचे काहीच कारण नसल्याचे स्पष्टीकरण दिले. ‘‘झहीरने विश्रांती घेतली, त्यामुळे तो मैदानावर उतरला नाही,’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये मॅक्ग्रा
दुबई : ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा मानाच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका कसोटीदरम्यान मॅक्ग्राला औपचारिकरीत्या सन्मानित करण्यात येईल. १२४ कसोटींत मॅक्ग्राने ५६३ बळी घेतले आहेत. २५० एकदिवसीय सामन्यांत २२.०२च्या सरासरीने ३८१ बळी टिपले आहेत. १९९९, २००३ आणि २००७ अशा सलग तीन विश्वचषकविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा मॅक्ग्रा अविभाज्य घटक होता.

Story img Loader