* यंदाच्या हंगामातला पहिला विजय
*  मध्य प्रदेशवर सात धावांनी सनसनाटी विजय
*  झहीरचे पाच बळी
एकामागोमाग एक सामने.. प्रत्येक सामन्यागणिक तीन गुणांवर मानावे लागणारे समाधान.. पहिल्या विजयाची प्रतीक्षा.. या सगळ्याला बाजूला सारत मुंबईने अनुभवी झहीर खानच्या निर्णायक पाच बळींच्या जोरावर मध्य प्रदेशवर सात धावांनी मात केली.
३११ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळालेल्या मध्य प्रदेशने जलाज सक्सेनाच्या शतकी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. अकराव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ईश्वर पांडेने झहीर खानला षटकार खेचत सामन्यातली चुरस कायम ठेवली. पुढच्या षटकांत अभिषेक नायरला दोन षटकार वसूल केले. त्याक्षणी मध्य प्रदेशला आठ धावांची आवश्यकता होती. विजयाचे पारडे दोलायमान होते. अभिषेक नायरला तिसरा षटकार खेचण्याच्या नादात ईश्वर पांडेने चेंडू जोरदार टोलवला मात्र तो थेट बदली क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. झेल टिपला जाताच मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.  
तत्पूर्वी सकाळी ५ बाद १९२ वरून पुढे खेळणाऱ्या मुंबईने २५० धावांवर आपला डाव घोषित केला. अभिषेक नायरने आक्रमक ६२ धावांची खेळी केली. मध्य प्रदेशला विजयासाठी ३११ धावांचे आव्हान मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशने चांगली सुरुवात केली. नमन ओझा आणि जलाज सक्सेनाने ९० धावांची सलामी दिली. इक्बाल अब्दुल्लाने ओझाला बाद केले. यानंतर अंकित शर्माने सक्सेनाने साथ दिली. झहीरने अंकित शर्माला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर उदित बिर्ला झहीरची शिकार ठरला. कर्णधार देवेंद्र बुंदेला झहीरचा आखूड टप्प्याचा चेंडू खेळताना फसला आणि यष्टीरक्षक तरेने त्याचा सुरेख झेल टिपला. नायरच्या थेट धावफेकीवर शतकवीर सक्सेना बाद झाला. त्याने १६ चौकार आणि एका षटकारासह १२८ धावांची खेळी केली. झहीरने राहुल बक्षी आणि आनंद राजनला बाद करत मध्य प्रदेशला बॅकफूटवर ढकलले. ३८ धावा करणाऱ्या हरप्रीतला नायरने बाद केले. ईश्वर पांडेने लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते अपुरेच ठरले. ७९ धावांत ५ बळी टिपणाऱ्या झहीर खानलाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई ३०४ आणि ५ बाद २५० डाव घोषित; विजयी विरुद्ध मध्य प्रदेश : २४४ आणि सर्वबाद ३०३ (जलाज सक्सेना १२८, हरप्रीत सिंग ३८, झहीर खान ५/७९, अभिषेक नायर ३/५६).     

Story img Loader