अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि विजिगीषू वृत्तीच्या जोरावर नाबाद ७९ धावांची झुंजार, प्रेरणादायी, खडूस खेळी साकारत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रणजी क्रिकेटला अलविदा करताना संघाच्या विजयात सिंहाचा वाटाही उचलला. गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर मुंबईचा संघ अडचणीत सापडला असताना सचिन एका बाजूने खंबीरपणे उभा राहिला आणि आपल्या लाजवाब खेळीच्या जोरावर संघाला चार विकेट्सने विजय मिळवून दिला.
ज्या वेळी सचिनने रणजीमध्ये पदार्पण (१० डिसेंबर १९८८) केले, त्यादिवशी जन्मलेल्या धवल कुलकर्णीने सचिनला चांगली साथ दिली. सचिनला अखेरच्या सामन्यात विजयाची भेट मुंबईच्या संघाला द्यायची होती, पण सचिनने आपल्याच हाताने विजयाचा घडा भरत स्वत:लाच स्वत:च्या खेळीने अविस्मरणीय भेट दिली.
दुसऱ्या दिवशी मुंबईला विजयासाठी ३९ धावांची गरज होती आणि चार फलंदाज त्यांचे बाकी होते. सकाळचे सत्र गोलंदाजीसाठी पोषक समजले जात असले तरी सचिनपुढे कोणत्याही गोलंदाजाची डाळ शिजली नाही. अखेरची रणजी खेळी खेळण्यासाठी मैदानात उतरताना सचिनला दोन्ही संघांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. सचिनच्या प्रत्येक धावेवर प्रेक्षकांमधून ‘सचिन.. सचिन..’ चा नाद घुमत होता. अपेक्षांचे ओझे आणि गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर अखेर सचिन जिंकला व संघालाही त्याने जिंकवले. १७५ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची संयत खेळी साकारत सचिनने एका तपापेक्षा जास्त रणजी कारकिर्दीचा गोड शेवट केला. या दमदार खेळीमुळे सचिन आपल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडेच क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.
संक्षिप्त धावफलक
हरयाणा (पहिला डाव) : १३४
मुंबई (पहिला डाव) : १३६
हरयाणा (दुसरा डाव) : २४१
मुंबई (दुसरा डाव) : ९३ षटकांत ६ बाद २४० (सचिन तेंडुलकर नाबाद ७९, कौस्तुभ पवार ४७, अजिंक्य रहाणे ४०; धवल कुलकर्णी नाबाद १६; मोहित शर्मा २/७९)

 

Story img Loader