भारतीय क्रिकेट संघान तब्बल १३ वर्षांनंतर आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. टी-२० मालिका जिंकून भारताचा जगज्जेता संघ आज भारतात परतला आहे. पंतप्रधान मोदींशी हितगुज साधल्यानंतर भारतीय संघ मुंबईत येईल. दरम्यान भारतीय संघातील मुंबईकर खेळांडूचा महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्कार करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही तात्काळ या मागणीचा सकारात्मक विचार करत मुंबईकर खेळाडूंचा विधीमंडळात सत्कार करण्यास मान्यता दिली. उद्या (दि. ५ जुलै) खेळाडूंना विधीमंडळात बोलावून सन्मानीत करण्यात येणार आहे.
याबद्दल माहिती देताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मुंबईकर खेळाडू आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अंतिम सामन्याच ज्याच्या कॅचमुळे सामना फिरला तो सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे चारही खेळाडू मुंबईकर आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. ज्याप्रकारे २००७ आणि २०११ साली विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबईकर खेळाडूंचा यथोचित सन्मान केला होता. त्याप्रमाणेच यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करायला हवा. या मागणीनंतर आता खेळाडू उद्या विधीमंडळात येणार आहेत.
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमदार विधीमंडळात आलेले आहेत. भारतीय खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आमदार उत्सुक आहेत, अशी माहितीही आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करण्याबाबत होकार दिला असून आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही यासाठी हिरवा कंदील दाखविला असून उद्या त्यांच्या दालनात खेळाडूंचा सत्कार करण्यात येईल.
© IE Online Media Services (P) Ltd