चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह ‘अ’ गटामध्ये १९ गुणांनिशी अव्वल स्थान पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला आता वेध लागले आहेत ते उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे. शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर गटामध्ये तळाला असणाऱ्या झारखंडशी मुंबईची गाठ पडणार आहे. हा सामना मुंबईने जिंकल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीचा दरवाजा उघडू शकतो.
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि झहीर खान हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेल्याने ते मुंबईच्या संघात नसतील, तर दुखापतीमुळे धवल कुलकर्णीही संघात नसेल. त्यामुळे युवा खेळाडूंसह खेळणाऱ्या मुंबईचा या सामन्यात कस लागणार आहे.
गेल्या सामन्यात मुंबईने विदर्भवर ३३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. सध्याच्या हंगामात वसिम जाफर (३४९ धावा ) आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर असलेला आदित्य तरे (४०६ धावा) चांगल्या फॉर्मात आहेत, तर मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादव, हिकेन शाह आणि सिद्धेश लाड यांच्यावर असेल. कर्णधार अभिषेक नायरकडून चकमदार अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबईच्या गोलंदाजीची धुरा या वेळी शार्दूल ठाकूर आणि विशाल दाभोळकर यांच्यावर मुख्यत्वेकरून असेल. ४२ वर्षीय फिरकीपटू प्रवीण तांबे याला संधी मिळते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
झारखंडच्या संघात जास्त नावाजलेले खेळाडू नाहीत. कर्णधार शाहबाज नदीम (९ बळी) चांगल्या फॉर्मात आहे, तर सौरभ तिवारीने आतापर्यंत दमदार कामगिरी (४८५ धावा) केली आहे. इशांत जग्गीसारखा अनुभवी फलंदाज संघात असला तरी त्याला अजूनही सूर गवसलेला नाही.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अव्वल मुंबईसमोर कमकुवत झारखंड
चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह ‘अ’ गटामध्ये १९ गुणांनिशी अव्वल स्थान पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला आता वेध लागले आहेत ते उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे.
First published on: 06-12-2013 at 02:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais missing stars give jharkhand opening